नाशिक : शहरात लसीकरणासाठी शुक्रवारी नागरिकांना वणवण करण्याची वेळ आली. शहरातील २९ लसीकरण केंद्रांपैकी केवळ ४ केंद्रांवरच लस उपलब्ध असल्याने शेकडो नागरिकांना लस मिळू शकली नाही.
जिल्ह्यात महानगरपालिकेची लसीकरणाची २९ केंद्रे आहेत; मात्र गुरुवारपासूनच महापालिकेकडील लसींचा साठा संपुष्टात आला होता. त्यामुळे मनपाच्या प्रशासनाने जिल्हा परिषदेकडून लस साठा मागवला. त्यांनी २७०० लस उपलब्ध करुन दिल्या. हा साठा शहरातील केवळ पंचवटीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात, मायको रुग्णालय, ईएसआयसी आणि नाशिकरोडच्या जेडीसी बिटको रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामुळे केवळ या चार रुग्णालयांमध्येच शुक्रवारी लसीकरण होऊ शकले. शनिवारी काही प्रमाणात लसींचा साठा महापालिकेला मिळणार असला तरी तोपर्यंत आजदेखील केवळ इंदिरा गांधी रुग्णालय, ईएसआयसी रुग्णालय आणि बिटको रुग्णालय येथेच लस मिळू शकणार आहे.
इन्फो
केवळ दुसरा डाेस
शहरातील अनेक नागरिकांना शुक्रवारी अन्य केंद्रांवर लस मिळालीच नाही. पण मनपाने ज्या चार केंद्रांवर लस दिल्याचा दावा केला आहे, तिथेदेखील ती लस केवळ दुसऱ्या डोस घेणाऱ्यांनाच उपलब्ध करुन दिली जात असल्याच्या तक्रारी आल्या. याबाबत मनपा प्रशासनाशी संपर्क साधला असता दुसरा डोस घेणाऱ्यांना अग्रक्रम असला तरी पहिला डोस घेणाऱ्यांनादेखील लस निर्धारित तीन केंद्रांवर शनिवारपासून लस दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.