खामखेडा : येथील आरोग्यवर्धीनी केंद्राच्या इमारतीच्या छताला पत्रे बसविण्याचे काम सुरू असतांना त्यात हलक्या दर्जाचे लोखंडी पत्रे वापरण्यात येत असल्याची बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने काम बंद पाडण्यात आले.खामखेडा येथे एका लहानशा उपकेंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले होते.त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राची नूतन इमारत उभारण्यात आली. त्यावेळी इमारतीच्या छताला सिमेंटचे पत्रे बसविण्यात आले होते.परंतु त्या पत्र्यांचे आयुर्मान संपल्याने व पत्रे फुटल्याने पावसाळ्यात संपूर्ण इमारत गळकी झाली होती. तेव्हा जिल्हा परिषदेच्या विशेष निधीमधून इमारत दुरु स्ती व इमारतीचे पत्रे बदलण्याचे काम आज रोजी सुरू करण्यात आले होते. परंतु यामध्ये हलक्या दर्जाचे व फार काळ न टिकणाऱ्या लोखंडी पत्र्यांचा वापर करण्यात येत असल्याचे उपसरपंच संजय मोरे, माजी सरपंच अण्णा पाटील, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र शेवाळे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी काम बंद पाडले. जोपर्यंत उच्च व चांगल्या दर्जाच्या नामांकित कंपनीचा कोटिंग पत्रा वापरण्यात येत नाही तोपर्यंत काम सुरू करू दिले जाणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
आरोग्य केंद्र दुरूस्तीचे काम नागरिकांनी पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 2:36 PM