नाशिक : केंद्रीय परिवहन विभागाने वाहन शुल्कात केलेल्या दरवाढीविरोधात शहरातील विविध चौदा वाहतूक संघटनांनी मंगळवारी (दि़३१) चक्का जाम व धरणे आंदोलन केले़ वाहतूकदारांच्या या आंदोलनाची केंद्र व राज्य सरकाने दखल न घेतल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे़ या आंदोलनामुळे शाळकरी विद्यार्थी व नोकरदार वर्गाचे हाल झाले, तर दुपारनंतर बसेस व खासगी प्रवासी वाहने सुरू झाली़ दरम्यान, आंदोलनात सहभागी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले़ प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर वाहतूकदारांच्या विविध संघटनांनी एकत्र येत धरणे आंदोलन सुरू केले़ सकाळी १० वाजेपासून सुरू झालेले हे आंदोलन सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते़ या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांनी सांगितले, की केंद्र सरकारने हुकूमशाही पद्धतीने केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ च्या नियमात फेरबदल केला आहे़ त्यामध्ये अन्यायकारक पद्धतीने रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो व इतर वाहनांचे विविध शुल्क व दंडामध्ये सुमारे १० ते ३० पट दरवाढ केली आहे़ ही दरवाढ करताना वाहनधारकांना विश्वासात न घेता व्यवसाय व त्यावरील उत्पन्नाचाही विचार केलेला नाही़ यामुळे व्यावसायिकांना उदरनिर्वाह करणे जिकिरीचे होणार आहे़ प्रवासी व मालवाहतूकदारांच्या या आंदोलनाची दखल न घेतल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे़ या धरणे आंदोलनात गणेश रणमाळे, मजहर सय्यद, अय्याज काझी, किरण गोसावी, किशोर लोखंडे, अली शेख, योगेश दुसाने, संजय ठाकरे आदिंसह वाहतूकदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ या धरणे आंदोलनात सहभागी झालेले राज्य कृती समितीचे उपाध्यक्ष हैदर सय्यद, श्रमिक सेनेचे सुनील बागुल,भगवंत पाठक यांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले़ (प्रतिनिधी)
वाहतूकदारांच्या बंदने नागरिकांचे हाल
By admin | Published: February 01, 2017 1:11 AM