त्र्यंबकेश्वर : गणपती विसर्जन करण्याच्या एकमेव असलेल्या गौतम तलावात लाखो मासे मृत झाल्यानंतर तलावाभोवती नागरिकांनी गर्दी केली.बघ्यांची गर्दी वाढत असून, मासे मृत कसे झाले याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. येथील ललिता शिंदे व नाशिकचे राजेश पंडित यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकाराबद्दल तक्र ार दाखल केली आहे. येथील काही कार्यकर्त्यांनी त्वरित तळ्यात उतरून फुगून आलेले हजारो मासे काढून गोण्यांमध्ये भरून बाहेर नेले. एक किलो वजनापासून ते तीन ते चार किलो वजनापर्यंतचे मासे गोण्यांमध्ये भरून गावाबाहेर नेले. हे मासे खाण्याजोगे नसल्याने ते विषारी झाल्याने संबधितांनी ते जाळण्याचा निर्णय घेतला. गावात मात्र माशांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. कोणी म्हणते पाण्यात काहीतरी विषारी पदार्थ टाकून माशांचा मृत्यू घडवून आणला. या ठिकाणी काही आदिवासी व महिला माशांसाठी खाद्य म्हणून पाव विकून उदरनिर्वाह करीत असत. पावाचे तुकडे करून पाण्यात टाकले की, शेकडो मासे गोळा होऊन पावाचा फडशा पाडीत. माशांची ही गंमत पाहण्यासाठी यात्रेकरू पर्यटक पुन्हा पुन्हा पाव खरेदी करीत. मुक्या व गरीब जलचरांची ही मजा पाहताना बच्चे कंपनी अक्षरश: रंगून जात. तलावात पाव फेकले तरी शिल्लक असलेले मासे पावाला शिवतदेखील नाहीत. दरम्यान येथील ललिता शिंदे व राजेश पंडित यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकाराबद्दल तक्र ार दाखल केली आहे.