---------------------
दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
सिन्नर : शहरातून ओला व सुका कचरा घेऊन जाणाऱ्या घंटागाडीतून जुन्या गुळवंच रस्त्यावर कचरा पडत असल्याने दुर्गंधी निर्माण होत आहे. शहरातून घंटागाड्या मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करतात. घंटागाड्या पूर्ण खचून भरल्यानंतर त्या खत प्रकल्पाकडे रवाना होतात. मोठ्या प्रमाणात त्यात घाण असते. मात्र कानडी मळ्यातून जाताना त्यातील कचरा बऱ्याचदा रस्त्यावर पडतो. त्यामुळे या भागातील नागरिकांना अडचण सहन करावी लागते. घंटागाडी भरताना काळजी घेण्याची गरज आहे.
--------------
उघड्यावर शौचामुळे आरोग्याचा प्रश्न
सिन्नर: शहराच्या पूर्व भागातील कानडीमळा ते काळेमळा या भागातून जाणाऱ्या रस्त्यावर अनेक व्यक्ती उघड्यावर शौचास बसत असल्याने दुर्गंधीसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या रस्त्याने सकाळी लोक मॉर्निंग वॉकसाठी जात असतात. अशावेळी लहान मुले रस्त्याच्या कडेला तर मैदानावर पुरुष शौचास बसत असल्याचे चित्र आहे. शौचालयाचा वापर केला जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
-------------
औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याची दुरवस्था
सिन्नर: सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीच्या (स्टाईस)कडेला पश्चिमेकडे असलेल्या उपनगरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या भागात उज्वलनगर, शंकरनगर, गणेशनगर या भागात मुसळगाव शिवारातील नागरिकांचे व औद्योगिक वसाहतील कामगारांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
----------------
कार्यकर्ते गुंतले आकडे मोडीत
सिन्नर: तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडल्यानंतर कार्यकर्ते आता मतदानाच्या आकडे मोडीत गुंतले असल्याचे चित्र आहे. कोणत्या वॉर्डात किती मतदान झाले. कुठे कमी, कुठे जास्त, कोणाचा फायदा कोणाला असे तर्कविर्तक लावण्यात सर्वजण गुंतले आहे. सोमवार (दि. १८) रोजी मतमोजणी असून तोपर्यंत कार्यकर्ते कोण विजयी होईल याचा अंदाज करण्यात गुंतले आहेत. सोमवारी मतमोजणी होईपर्यंत कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली आहे.