नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागाने पोलिसांच्या सहकार्याने सोमवारपासून हेल्मेट व सीट बेल्ट नियमाचा भंग करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली़ पहिल्या दिवशी पेठरोड व मुंबईरोडवर नियमांचा भंग करणाऱ्या १२४ दुचाकी व चारचाकी वाहनचालकांवर कारवाई करून सुमारे ४० हजार रुपयांचा महसूल गोळा केला़ एकीकडे नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा, तर दुसरीकडे पोलीस व आरटीओ विभागातील अधिकारीच नियमांना तिलांजली देत असल्याचे चित्र संपूर्ण शहरात होते़ त्यामुळे या विभागांची कारवाई म्हणजे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण’ असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती़ आरटीओच्या एका पथकाने सकाळी अकरा ते दोन पेठ फाटा, तीन ते पाच नवीन भाजी मार्केट चौक, तर पाच ते सहा वाजेदरम्यान हॉटेल राऊ या ठिकाणी नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे या विभागाच्या महसुलात सुमारे २५ हजारांची भर पडली़ पेठ रस्त्यावर हेल्मेट न वापरणारे ६०, तर सीट बेल्ट न लावणारे १८ अशा ७८ वाहनधारकांवर कारवाई करून सुमारे २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़दुसऱ्या तपासणी पथकाने मुंबई नाका परिसरात मोहीम राबविली़ या मोहिमेत हेल्मेट न वापरणारे ३४, तर सीट बेल्ट न लावणाऱ्या १२ अशा ४६ वाहनधारकांवर कारवाई करून सुमारे १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ आरटीओच्या दोन्ही पथकांचे मिळून १२४ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली़ मंगळवारी (दि़२७) महसूल सुरक्षा पथक नाशिक-दिंडोरी रस्त्यावर, तर शहर वाहतूक पथक नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर मोहीम राबविणार आहे़ दरम्यान, या कारवाईच्या विरोधात छत्रपती युवा सेनेने विरोध दर्शविला आहे़ (प्रतिनिधी)
नागरिकांना हेल्मेटची सक्ती, अधिकाऱ्यांना मात्र मुक्ती
By admin | Published: October 27, 2015 12:09 AM