रविवारी जनता कर्फ्यूला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला मात्र सोमवारी सकाळी आठवडे बाजार बंद ठेवूनही काही व्यापाऱ्यांनी भाजीपाला व अन्य वस्तू विक्र ीसाठी आणल्याने नागरिकांनी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी केली होती. अनेक व्यावसायिकांनीही आपली दुकाने उघडी ठेऊन ग्राहकांची गर्दी करून जमावबंदीच्या आदेशाला हरताळ फासला आहे. पोलीस प्रशासनाने स्वत: येऊन दुकानदारांना विनंती करून प्रसंगी कठोर शब्दात सुनावत लॉक डाऊन केले. तरीदेखील दुचाकी व चार चाकी वाहनांची वर्दळ मोठया प्रमाणात दिसून आली . प्रशासनाने आवाहन करूनही त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखविणा-या व्यावसायिक व वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पाटोदा येथील आरोग्य केंद्राच्या वतीने घरोघरी जाऊन तपासणीचे काम सुरु केले आहे. केंद्राच्या कार्यक्षेत्रात सुमारे सहा उपकेंद असून २६ गावे आहेत. नोकरी,कामधंदा व व्यापारानिमित्त मुंबई ,पुणे व इतर शहरातून गाव, परिसरात आलेल्या सुमारे अडीचशे नागरिकांची तपासणी करून काही नागरिकांच्या हातावर विलगीकरणाचा शिक्का मारला जात असून अशा नागरिकांचा अहवाल जिल्हा रु ग्णालयात पाठविला जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमान पालवे यांनी दिली . पाटोदा आरोग्य केंद्राच्या वतीने हातावर विलगीकरणाचा शिक्का मारलेले नागरिक गावभर फिरत असल्याने ग्रामस्थांनी धसका घेतला आहे. दरम्यान, पाटोदा ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाबाबत जनजागृती केली जात असून सकाळ, संध्याकाळ गावात दवंडी दिली जात आहे. तसेच ध्वनिक्षेपकावरून गाव व वाड्या- वस्त्यांवर गावात दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. बँका व पतसंस्था तसेच किराणा दुकानात लांबच लांब रांगा दिसत असल्या तरी त्यांच्या चेहºयावर कोरोनाची भीती दिसत आहे.
जमावबंदी आदेश असतानाही पाटोद्यात नागरिकांची बेफिकिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 5:40 PM