कृष्णनगर येथे डॉक्टर अग्रवाल यांचे आधारशिला हॉस्पिटल असून, सदर हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू केल्याचे परिसरातील नागरिकांना समजताच, स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी धाव घेत सेंटरला विरोध केला. सदर इमारत रहिवासी इमारत असून, त्या इमारतीत दहा फ्लॅटधारक आहेत. याशिवाय नागरिकांचा व रुग्णांचा येण्या-जाण्याचा इमारतीतील रस्ता एकच असल्याने, इमारतीत राहणाऱ्या अन्य नागरिकांना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. इमारतीस अग्निशमनचा ना हरकत दाखला नसून, पार्किंग व्यवस्था नसल्याने महापालिका प्रशासनाने कोविड सेंटरची परवानगी रद्द करावी, असे आमदार पवार व नगरसेवक माने यांनी आयुक्तांकडे केलेल्या पत्रात नमूद केले आहे.
मंगळवारी दुपारी स्थानिक नागरिकांनी आधारशिला सेंटरबाहेर गर्दी केल्याने घटनास्थळी पंचवटी पोलीस दाखल झाले होते. त्यानंतर, नागरिक स्थानिक लोकप्रतिनिधींनी महापालिकेत धाव घेतली होती. नागरिकांची दाट वसाहत असल्याने कोविड सेंटर तत्काळ बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.