----------
सिडकोत दोन तास ताटकळले
सिडको भागातील महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालय तसेच अचानक चौक येथील उपकेंद्रात लस शिल्लक नसल्याचे गुरुवारी सकाळी सांगण्यात आले. शुक्रवारी गुड फ्रायडे असल्याने शासकीय सुट्टी असल्याने आता नागरिकांना शनिवारपर्यंत लस घेण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शासनाने १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींसाठी कुठल्या प्रकारच्या आजाराचे कारण न देता मोफत लस देण्याची घोषणा केल्याने सिडकोतील स्वामी समर्थ रुग्णालय तसेच अचानक चौक येथील उपकेंद्र येथे नागरिकांनी सकाळपासूनच लस घेण्यासाठी गर्दी केली होती. मात्र दोन तास होऊनही लस उपलब्ध न झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी लसचा पुरवठा न झाल्याने आज नागरिकांना लस देता येणार नसल्याचे जाहीर केले. तसेच अशा प्रकारचे फलकही बाहेर लावल्याने नागरिकांनी यानंतर काढता पाय घेतला.
--------
भारतनगरला दोन दिवसांपासून लस नाही
इंदिरानगर परिसरात महापालिकेच्या वतीने दोन ठिकाणी लसीकरण सुरू आहे. परंतु लस उपलब्ध न झाल्याने गुरुवारी लसीकरण बंद असल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. महापालिकेच्या वडाळा गावातील सावित्रीबाई फुले प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच भारतनगर येथील केंद्रात दोन दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद आहे. या दोन्ही केंद्रांत दररोज सकाळपासून लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. १०० नागरिकांना लसीकरण करण्यात येते.