मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात लावण्यात आलेले कडक निर्बंध शिथिल केल्यानंतर सोमवारी (दि. २४) बाजारपेठेत नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी काहीशी गर्दी केली होती. मात्र यावेळी कोरोनाचे नियम पाळताना नागरिक दिसून आले.
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शासनाचे कडक निर्बंध हटविल्यानंतर शेतमालाचे लिलाव सुरू झाले. मका, धान्य, कडधान्य, भुईमूग शेंगा शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणले. तालुक्यातील मुंगसे बाजार समितीतदेखील कांदा लिलाव सुरू झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी मुंगसे बाजार समितीत आणला. कांद्याला चांगला भाव मिळाल्यास आणखी कांद्याची आवक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरात अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना पोलीस सहकार्य करताना दिसून आले. मात्र तरीही बहुसंख्य नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले.