सोमवारपासून प्रशासनाने कोरोना नियम शिथिल केल्याने नागरिकांनी सकाळपासून घराबाहेर पडणे पसंद केले होते. कोणी भाजीपाला तर कोणी किराणा खरेदीसाठी घराबाहेर पडत होते. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी काहींनी गर्दी केली होती तर अनेक युवक लॉकडाऊन संपल्याचा आनंद घेण्यासाठी रस्त्यावर दुचाकी फिरवून घिरट्या घालत होते.
जीवनावश्यक वस्तूत मोडणारी दुकाने सुरू होती; मात्र त्यात आणखी भर म्हणून कुठे वाहन दुरुस्ती केंद्र तर कुठे इस्तरी, सलून, हार्डवेअर दुकाने सुरू होती अनेकांनी लॉकडाऊन संपला, असे गृहीत धरून सोमवारी दुकानांची साफसफाई काम हाती घेतले होते.
बारा दिवस निर्बंध लादत प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर फिरण्यास मनाई केली होती. आवश्यक गरजेनुसार नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे सूचित केले होते. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू केली होती तर मनपा प्रशासनानेदेखील अनावश्यक गर्दी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम सुरू केलेली होती; परंतु सोमवारी कोरोना नियम शिथिल केल्यानंतर नागरिक घराबाहेर पडले खरे; मात्र त्यांना टोकणारे पोलीस महापालिका प्रशासन पथक गायब झाल्याने लॉकडाऊन संपला, असे गृहीत धरून नागरिकांना एकप्रकारे मोकळीक मिळाली.
सोमवारी रस्त्यावर दुचाकी, चारचाकी, रिक्षा यांसह खासगी चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात उतरल्याने पंचवटीतील सर्व मुख्य तसेच गल्लीबोळातील रस्त्यावर वाहनांची वर्दळ दिसून आली. रस्त्यावर दुतर्फा उभ्या राहणाऱ्या हातगाड्या तसेच भाजीपाला खरेदीसाठी महिलांनीदेखिल मोठी गर्दी केल्याने
नियम शिथिल करताच पहिल्याच दिवशी डिस्टनसिंगचा फज्जा उडाला.