नाशिक : विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करियरची वाट निवडावी. तुमच्या ज्ञानाचा वापर समाजातील समस्या सोडविण्यासाठी व्हावा. मेहनत, चिकाटीने यशस्वी करियर करण्यासह चांगला नागरिकही घडला पाहिजे, असा सूर लाडशाखीय वाणी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यात उमटला.विद्यार्थी गुणगौरव आणि मार्गदर्शन सोहळ्याप्रसंगी रामानुजम अकॅडमीचे संचालक प्रा. भास भामरे, अभियंता पीयूष बागडे, अंतराळ अभ्यासक अपूर्वा जाखडी, नोबेल फाउंडेशनचे जयदीप पाटील, गणिततज्ज्ञ प्रा. डॉ. दिलीप गोटखिंडीकर, विज्ञान शिक्षक हर्षल कोठावदे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी जाखडी यांनी चित्रफिती, दृकश्राव्य सादरीकरणातून अंतराळातील स्थिती, चांद्रयान मोहीम- २ यावरील वैज्ञानिक माहिती अतिशय रंजक स्वरूपात दिली. प्रा. भामरे यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या संधी यावर माहिती दिली.दरम्यान, आयआयटीमधून उत्तीर्ण झालेले युवा अभियंता पीयूष बागड यांनी, अभियंत्यांनी आपल्या ज्ञान, कौशल्याचा उपयोग समाजातील समस्या सोडवण्यासाठी करावा तसेच शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनातील समस्या सोडविण्यासाठी अभिनव संशोधन करावे, असे आवाहन केले.दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते १०वी ते पीजीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रारंभी हेमंत नेरकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन परी तेलंग, पद्माकर बागड, उमाकांत वाकलकर यांनी केले. याप्रसंगी लाडशाखीय वाणी मित्रमंडळाचे अध्यक्ष सचिन बागड, सचिव नीलेश कोतकर, उपाध्यक्ष गिरीष मालपुरे, विनोद दशपुते, विजय मेखे, राजेश कोठावदे, विठ्ठल मोराणकर, जितेंद्र येवले, प्रसाद बागड, अतुल वाणी, संजय येवले, भूषण सोनजे यांची उपस्थिती होती.चिमुकल्यांनी लक्ष वेधलेप्रारंभी चिमुकल्यांनी माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, एडिसन आईनस्टाईन अशा विविध शास्त्रज्ञानांचा, रोबोट तसेच अंतराळवीरांचे पोषाख परिधान करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी स्नेहा नेरकर यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेची हुबेहूब प्रतिकृती असलेल्या रांगोळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
यशस्वी करियरसह नागरिकही घडावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 1:12 AM