-------------
अशोक स्तंभवर हवा वाहतूक पोलीस
नाशिक : शहरातील अनेक वाहनचालक अशोक स्तंभासारख्या गजबजलेल्या परिसरातही सुसाट वेगाने निघून जातात. त्यामुळे अनेक वाहनचालकांचा गोंधळ उडतो. तसेच अनेकदा किरकोळ अपघात होऊन बाचाबाचीचे प्रसंग घडतात. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अवजड वाहनांना पूलावरुनच जाण्याची सक्तीची गरज
नाशिक : शहरातील मुंबई नाका, व्दारका भागातून जाणाऱ्या मोठ्या मालवाहू ट्रकमुळे अपघाताचा धोका अधिक असल्याने त्यांना पुलावरुनच जाण्याची सक्ती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात व्यावसायिक इमारती, शाळा, महाविद्यालये, कार्यालयांना जाणाऱ्या वाहनचालकांची सतत धावपळ असते. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असल्याने अवजड वाहनांना पुलावरुनच जाण्याची सक्ती करण्याची नागरिकांची मागणी आहे.
अद्यापही मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईची मागणी
नाशिक : शहरातील विविध रस्त्यांवर अद्यापही विनामास्क बेशिस्तपणे फिरणाऱ्या नागरिकांवर दिवसरात्र कठोर कारवाईची गरज निर्माण झाली आहे. घराजवळच्या परिसरात, लहान मोठ्या कॉलन्यांमध्येदेखील मास्कदेखील न घालता अनेक नागरिक रस्त्यावरून वावरत आहेत. या बेशिस्त नागरिकंवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
मास्क अर्धवट घालून भ्रमंती
नाशिक : कोरोनाचा प्रसार इतक्या मोठ्या प्रमाणात होत असूनही अनेक नागरिक घराबाहेर वावरतानादेखील मास्कचा केवळ देखावा करीत आहेत. मास्क केवळ तोंडावर अर्धवट ठेवून वावरत आहेत. मास्कने नाक आणि तोंड दोन्ही झाकणे बंधनकारक आहे, याची जाणीवदेखील अशा नागरिकांना करुन देण्याची आवश्यकता आहे.