निफाड (ए. एस. चकोर) : तालुक्यातील काही रस्त्यांची अवस्था बऱ्याच वर्षांपासून दयनीय झाली असून हे रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची गरज असल्याचे जनतेचे म्हणणे आहे. तालुक्यात जळगांव फाटा ते कुरुडगांव या चार किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालवताना अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. हा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी झाले होते. मात्र हे सर्व काम उखडले असून या रस्त्यावर प्रचंड मोठे खोल खड्डे पडले आहेत. या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करावे अशी मागणी होत आहे. गोदाकाठच्या खानगाव थडी येथील नांदूरमधमेश्वर पूल ते करंजी, ब्राम्हणवाडे या रस्त्याचे पार वाटोळे झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसे पाहिले तर कोपरगाव , सिन्नरकडे जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. मात्र, हा रस्ता प्रचंड प्रमाणात खराब झाल्याने या रस्त्यावरून कोपरगाव, सिन्नरकडे जाणे टाळतात व दुसऱ्या लांबच्या मार्गाचा अवलंब करतात. यामुळे इंधन जादा लागते व वेळही जास्त लागतो. या रस्त्याच्या मार्गावरील तारुखेडले, तामसवाडी,करंजी व इतर गावातील नागरिक या रस्त्याला वैतागले आहेत. या रस्त्याच्या कडेने कमी उंचीच्या बाभळी दाटीवाटीने वाढलेल्या आहेत. याच परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याने त्यामुळे रात्रीच्या सुमारास या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या परिसरातील नागरिकांना तातडीने नाशिक, निफाड , सायखेडा येथे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी न्यायचे असल्यास वाहन खड्डयांमुळे वेगाने नेता येत नाही. त्यामुळे रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. गोदाकाठचा करंजगाव ते मांजरगाव रस्ता हा महत्त्वाचा मानला जातो. मात्र याही रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. शिवाय गोदाकाठच्या करंजगाव ते शिंगवे, तळवाडे ते भेंडाळी या रस्त्यांनाही खड्डे पडले आहेत. चाटोरी ते रामनगर या रस्त्याचे काम लवकर सुरू करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहेत.
---------------------
निफाड सहकारी कारखाना ते सुकेणे फाटा त्याचप्रमाणे निफाड कारखाना ते सुकेणे या दोन्ही रस्त्यांना खड्डे पडले आहेत. नाशिक-औरंगाबाद मार्गावर बोकडदरे ते पिंपळस रामाचे या १४ किलोमीटरच्या अंतरात प्रचंड खड्डे पडले होते. हे खड्डे अनेकवेळा दुरुस्त करण्यात आले. मात्र, दुरुस्ती करताना चुकीच्या पद्धतीने, घाईघाईने खड्डे बुजविल्याने या रस्त्याची दुरूस्ती झाली आहे. या खड्ड्यांतून वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. नमूद केलेल्या सर्व रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने विशेषतः शेतकरीवर्गाला याचा त्रास सहन करावा लागतो. कारण या रस्त्यावरून शेतकरी वर्गाची वाहनांवरून ये-जा होत असते.
--------------------------
सर्व रस्त्यांवरून साखर कारखाने चालू झाल्यानंतर ऊसाने भरलेले ट्रक, ट्रॅक्टरची या रस्त्याने ये-जा मोठ्या प्रमाणात चालू असते. ही वाहने जाताना मोठमोठ्या खड्ड्यांमुळे ही वाहने हेलकावे खात जात असल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. या सर्व रस्त्यांची दुरुस्ती करताना, डांबरीकरण करतांना निकृष्ट दर्जाचे व्हायला नको. हे रस्ते दर्जेदार पद्धतीने होणे गरजेचे आहे. वरील नमूद केलेल्या यातील काही रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. तर काही रस्त्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींनी वरिष्ठ पातळीवर तातडीने प्रयत्न करून या रस्त्याचे डांबरीकरण, दुरुस्त्या केल्यास हा प्रश्न लवकर निकाली लागेल व वाहनधारक सुखावतील अशी निफाडच्या जनतेची अपेक्षा आहे.