नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील ४५ वर्षांवरील नागरिकांनी पहिला डोस घेऊन तब्बल अडीच ते पावणेतीन महिन्यांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दुसरा डोस तातडीने देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. नांदूरशिंगोटे उपकेंद्रांतर्गत ८५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नांदूरशिंगोटे, चास, चापडगाव व दोडी उपकेंद्रांचा समावेश आहे. ५ एप्रिलपासून लसीकरणास प्रारंभ करून पहिल्या टप्प्यात ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. त्यानंतर केंद्र शासनाने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लसीकरण करून घेण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. तसेच दुसऱ्या डोसमधील अंतर वाढल्याने ज्येष्ठ नागरिकांची घालमेल सुरू झाली आहे. ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस घेऊन तब्बल ८४ दिवसांचा कालावधी झाला आहे. नांदूरशिंगोटे उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या नांदूरशिंगोटेसह, मानोरी व कणकोरी येथे आतापर्यंत ८५० नागरिकांना पहिला डोस, तर १८ नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. चास उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या चाससह, नळवाडी व कासारवाडी येथे ३९३ नागरिकांनी पहिला डोस, तर दोघांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच दोडी ग्रामीण रुग्णालयात ४१९३ नागरिकांनी पहिला, तर १२७३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
---------------------
दिव्यांगांना लसीकरण
दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. दिव्यांग व्यक्तींना लसीकरण करण्याबाबत आरोग्य विभागास जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून लाभार्थ्यांची माहिती पाठविण्यात आली होती. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात ६० डोस उपलब्ध करण्यात आले होते. त्यापैकी १३ दिव्यांग व्यक्तींना पहिला डोस देण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के, डॉ. राहुल हेंबाडे, आरोग्य कर्मचारी व आशा सेविका उपस्थित होत्या.