मनमाड : इंधन डीलर्स असोसिएशनच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या विविध मागण्यांसाठी केलेला संप अखेर मुंबई येथे झालेल्या बैठकीत मागे घेण्यात आला. येथून जवळच असलेल्या इंधन कंपन्यांच्या पार्किंगमध्ये तसेच रस्त्यावर टँकर उभे असल्याचे पहावयास मिळाले. या संपाचा फटका सामान्य नागरिकांबरोबरच इंधन टॅँकरवर काम करणाऱ्या चालक व क्लीनरांना बसला. पानेवाडी, नागापूर, धोटाणे येथे इंधन कंपन्यांचे डेपो असून, या ठिकाणाहून पाच राज्यात इंधन पुरवठा करण्यात येतो. दररोज सुमारे एक हजाराच्या वर टँकर इंधन भरून रवाना होत असतात. इंधन डीलर्स असोसिएशनच्या गेल्या अनेक दिवसांपासूनच्या असलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची संघटनेची तक्रार आहे. वारंवार मागण्या करूनही विचार केला जात नसल्याने अखेर इंधन कंपन्या व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी डीलर्स असोसिएशनने इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेतला होता. या संपामुळे पेट्रोलपंपावर इंधनाचा तुटवडा भासत नागरिकांची गैरसोय होत होती. पेट्रोलपंपचालकांनी आधीच साठा करून ठेवला आहे. या संपामुळे इंधन कंपनी पार्किंग व परिसरात टॅँकर उभे करण्यात आले असल्याचे चित्र पहावयास मिळाले. यामुळे इंधन टॅँकरचालकांना व क्लीनरला सक्तीची सुटी घ्यावी लागत, त्यांच्या रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला होता. (वार्ताहर)
बहुतांश पेट्रोलपंपांवरील साठा संपल्याने अडचणी
पेट्रोलपंपचालक व वितरकांनी गुरुवारी (दि. ३) पेट्रोल खरेदी केली नाही. त्यामुळे मनमाडचा पानेवाडी डेपो दिवसभर ठप्प राहिला, तर शहरासह महामार्गांवरील बहुतांश पेट्रोलपंपांचे साठे संध्याकाळी संपले होते. शहरातील सुमारे ६५ व जिल्ह्यातील ४५० पंपचालकांनी पेट्रोल खरेदीवर बहिष्कार टाकला होता. पेट्रोल खरेदी दोन दिवस न करण्याचा पवित्रा राज्यासह जिल्ह्यातील पेट्रोल वितरकांनी घेतल्यामुळे तेल कंपन्या अडचणीत आल्या होत्या. जिल्ह्यातील एकूण साडेचारशेहून अधिक पेट्रोलपंपांवर पेट्रोलचा पुरवठा करण्यासाठी दिवसभरात पन्नासहून अधिक पेट्रोल व डिझेलचे टॅँकर्स पानेवाडीतून रवाना होतात; मात्र डेपोमधून एकही टॅँकर वितरकांनी मागविला नसल्याचा दावा शंकर टाकेकर यांनी केला होता. दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील पेट्रोलपंपचालक व वितरकांनी पेट्रोल खरेदीवर बहिष्कार टाकल्यामुळे पेट्रोलपंपांवरील साठा संपण्याच्या मार्गावर होते. मोजक्याच पेट्रोलपंपांवरून पेट्रोल, डिझेलची विक्री सुरू होती; मात्र बहुतांश पंपावरील पेट्रोल-डिझेलचा साठा अत्यल्प असल्याने, पेट्रोल-डिझेलची खरेदी केली जाणार नसल्यामुळे त्याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता होती. पेट्रोलपंप बंद राहणार असल्याच्या धास्तीने नागरिकांनी आपल्या वाहनात पेट्रोलचा जास्त साठा केला. जेणेकरून गैरसोय टाळता येईल, मात्र पेट्रोलपंपचालक व वितरकांनीही पेट्रोल संपल्यामुळे व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता काही वितरकांनी अगोदरच भूमिगत टाक्यांमध्ये अतिरिक्त साठा करून ठेवल्याची चर्चा आहे.