नाशिक : ग्रामीण भागापाठोपाठ शहरालाही बेमोसमी पावसाने झोडपले. अवचित आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. त्यातच रात्री वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक भागांत अंधाराचे साम्राज्य पसरले होते.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुरुवारपासून बेमोसमी पावसाला सुरुवात झाली. गुरुवारीच रात्री एक वाजेच्या सुमारास शहराच्या विविध भागांत मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर सकाळी थंडी अधिक वाढली होती. तसेच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर ऊन पडले असले तरी सायंकाळी ४ वाजेनंतर पुन्हा ढगाळ वातावरणाने अंधार पडला होता. सायंकाळी साडेसहा वाजेपासून शहराच्या विविध भागांत मेघगर्जनेसह पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागांत अक्षरक्ष: पावसाळ्याप्रमाणे पाणी साचले होते. वाहनचालकांना त्यातून मार्ग काढणे कठीण झाले होते. शहरात प्रमाणेच सिडको, सातपूर, इंदिरानगर, पंचवटी या भागांत सायंकाळी पावणे सातवाजेपासून तासभर विजेच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचा अंदाज नसल्याने रस्त्यावर असलेल्या नागरिकांचा गोंधळ उडाला. चाकरमान्यांना पावसामुळे कार्यालयात अडकावे लागले आणि काहींना सुरक्षित जागा शोधाव्या लागल्या. एक ते दीड तास झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा वाढला आहे. (प्रतिनिधी)
शहरालाही बेमोसमी पावसाने झोडपले
By admin | Published: December 13, 2014 2:09 AM