कसबे सुकेणे : राज्य परिवहन महामंडळाच्या पंचवटी आगाराची शहर बससेवा बंद झाल्याने सीबीएस ते ओझर-सुकेणे या मार्गावरील प्रवाशांची परवड झाली आहे. सद्य:स्थितीत कसबे सुकेणेला बससेवा नसल्याने प्रवाशी संताप व्यक्त करीत आहे.
पंचवटी शहर बस आगाराच्या वतीने सीबीएस -ओझर-सुकेणे या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून शहर बससेवा चालविण्यात येत होती. तोट्याचे कारण देत नाशिक शहरातील शहर बससेवा नाशिक मनपाकडे हस्तांतरित झाल्याने राज्य परिवहन महामंडळाने शहर बससेवा बंद केली आहे. कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओणे, थेरगाव, दात्याणे, जिव्हाळे, दीक्षी, शिलेदारवाडी, श्रमिकनगर, मिलिंदनगर,ओझर टाउनशिप, ओझर शहर व उपनगरे या भागातून नाशिकच्या विविध उपनगरांमध्ये व औद्योगिक वसाहतींमध्ये चाकरमाने, विद्यार्थी, व्यापारी व व्यावसायिक दररोज ये-जा करतात. सध्या या मार्गावर बससेवा नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
इन्फो...
सिटी लिंकचा सुकेणेपर्यंत विस्तार करा
नाशिक मनपा परिवहन विभागाची ‘सिटी लिंक’ ही शहर बससेवा येत्या ८ जुलैपासून सुरू होत आहे. सीबीएस-ओझर-ओझर टाऊनशिप-सुकेणा या मार्गावरून नाशिककडे दररोज शेकडो प्रवाशी जा-ये करतात, एसटीच्या शहर बससेवेलाही या मार्गावरून सर्वाधिक उत्पन्न मिळत होते. नाशिक मनपाच्या परिवहन विभागाने सिटी लिंकची सेवा सुकेणेपर्यंत विस्तारावी, अशी जोरदार मागणी ओझर, ओझरटाउनशिप व सुकेणा परिसरातून होत आहे.
कोट...
सुकेणे-ओझर या परिसरातून दररोज शेकडो प्रवाशी नाशिकमध्ये ये-जा करतात. सिटी लिंक शहर बसेस सुकेणेपर्यंत धावल्यास नाशिकच्या विविध उपनगरांची कनेक्टिव्हिटी मिळेल.
- संतोष शिरसाठ, प्रवाशी, ओझर