नाशिक : ज्या चालक-वाहकांच्या बळावर शहरात बसेस धावत आहेत त्यांच्याच सुरक्षिततेचा अन् रोजगाराचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे मंगळवारी (दि.२२) त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. परिणामी आगारामधून दुपारी एकही बस चालकांनी रस्त्यावर आणली नाही आणि प्रशासनाविरोधी तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. दुपारपासून संध्याकाळी उशिरापर्यंत शहर बसची चाके फिरली नसल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. शहर बससेवा बंद करण्याची भूमिका महामंडळाने घेतली असून, शहर बस तोट्यात असल्याचे दाखवून एकूण २०८ बसेसपैकी केवळ ८० बसेस रस्त्यावर धावत आहेत. ८० बसेसची महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी स्वनिर्णयाने कपात केली आहे. तसेच २५ ते ३० बसेस नादुरुस्त असल्यामुळे महामंडळाच्या गॅरेजमध्ये दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असतात. मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे बसेसची दुरुस्ती वेळेवर होत नाही. त्यामुळे चालक-वाहक यांना ‘ड्युटी’ मिळत नाही. त्यामुळे हजेरीवर जरी कर्मचाºयांची स्वाक्षरी असली तरी बस मिळाली नाही म्हणून त्या दिवसाचा पगार कापला जातो. ज्या चालक-वाहकाला बस मिळाली त्याच्या अन् प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर येतो. कारण एका बसमध्ये ५० पेक्षा अधिक दुपटीने प्रवासी प्रवास करतात; मात्र याचे कुठलेही सोयरसूतक महामंडळाच्या अधिकाºयांना नसून नागरिकांसह चालक-वाहकांचा जीव धोक्यात घालण्याचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप चालक-वाहकांनी केला आहे.
शहरातील बससेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:27 AM