नाशिक : शहर व परिसरात चोरट्यांकडून नागरिकांची वाहने लंपास करण्याचे सत्र सुरूच असून, दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरट्यांनी एकाच दिवशी लंपास केल्याचे उघडकीस आली आहे. दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पुन्हा चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्याची हद्द अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण सरकारी कार्यालयांपासून न्यायालय, रुग्णालय, महाविद्यालयांसह खासगी कार्यालयांसह बाजारपेठेचा वर्दळीचा परिसर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांसोबत दुचाकी चोरी, मोबाइल, सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. ठक्कर बाजार येथील नव्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारातून चोरट्यांनी श्रीहरी रमेश निकम (३८, रा.हिरावाडी) यांच्या मालकीची ३० हजारांची दुचाकी (एमएच १५,एझेड ७७४४) हातोहात लंपास केली. दुसऱ्या घटनेत याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जिल्हा रुग्णालयाच्या वाहनतळात उभी केलेली अमोल खंडू भांडारकर (रा. शिवाजीनगर) यांच्या मालकीची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १९ बीके २१३६) चोरट्यांनी पळवून नेली.तिसऱ्या घटनेत आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लासलगाव येथून चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीची चंद्रभान मुरलीधर जाधव यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. या तीन घटनांमध्ये सुमारे एकूण ९० हजार रुपयांच्या दुचाकी चोरट्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातून चोरून नेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. दुचाकीचोरी करणारी टोळी शाहरात पुन्हा सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.गुन्हे शाखेच्या वतीने दुचाकी चोरट्यांचा माग काढून मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे. शहरात दररोज एका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकीचोरी झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी असते. दुचाकीचोरीचे गुन्हे शहरात पुन्हा वाढल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या तीनही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:57 PM