नाशिक : शेतकरी संघनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या काळातही राज्य परिवहन महामंडळाची नाशिक जिल्ह्यातील बससेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. बसेस बंद करण्याच्या बाबतीत कोणत्याही सूचना नसल्याने जिल्हा आणि शहरातील सर्व बसेस सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले.
नव्या कृषी कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर बससेवर कोणताही परिणाम झालेला नाही. दुपारपर्यंत जिल्ह्यातील सर्व बसेस सुरळीत सुरू होत्या. प्रवाशांची संख्या मात्र कमी असल्याने दुपारनंतर अनेक फऱ्या रद्द करण्याची वेळ आली. सकाळी आंदोलनाची तीव्रता अधिक असल्याने बाहेरगावी जाणाऱ्या काही बसेसच्या काचांना जाळ्या लावण्याची दक्षता घेण्यात आली.
जिल्ह्यात तसेच शहरातील सकाळच्या फेऱ्या सुरळीत सुरू होत्या. जिल्ह्यात २० पेक्षा अधिक, तर शहरात ४० पेक्षा अधिक बसेस सुरू आहेत. या सर्व बसेस नियमितपणे सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. अत्यावश्यक सेवा असल्याने बसेस बंद करण्यात आलेल्या नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामीण भागात बसस्थानकांत प्रवाशीच नसल्याने निम्म्या फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली. बाजारपेठा तसेच बाजार समित्यादेखील बंद असल्यामुळे त्याचा परिणाम महामंडळाच्या बसेसवर झाला.