नाशिक महानगर परिवहन महामंडळ कंपनीच्या सिटी लिंक या बस सेवेचा गुरूवारी (दि.८) लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर दुपारी बस सेवा सुरू झाली. पहिल्याच दिवशी २० सीएनजी तर सात डिझेल बस रस्त्यावर आणण्यात आल्या. रात्री साडे नऊ वाजेपर्यंत साडे बाराशे प्रवाशांनी या बसमधून प्रवास केला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि.९) बस सेवेला प्रतिसाद चांगला मिळाला. एकूण २७ बस रस्त्यावर होत्या. या बसने नऊ मार्गांवर एकूण ६४५ फेऱ्या केल्या आणि त्या माध्यमातून ४ हजार ५६७ प्रवाशांची वाहतूक केली. दरम्यान या दोन दिवसातच महापालिकेच्या बस सेवेने एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
दरम्यान, या बस सेवेच्या वेळापत्रकात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. व्दारका आणि एमजी रोड येथे वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तेथून बस मार्गस्थ होताना वेळ लागत असून त्याचा परिणाम पुढील थांब्यावर होत आहे. त्यामुळे इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिममध्ये बस निर्धारित ठिकाणी दहा मिनिटे विलंबाने धावत आहे त्यामुळे आता दोन तीन दिवसात गर्दीचा विचार करून ती बस पुढील थांब्यावर किती वाजता पोहोचेल याचा विचार करून वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे.