नाशिक : विजेच्या माध्यमातून आर्थिक बचत आणि प्रखर प्रकाशासाठी महापालिकेच्या वतीने शहरात लावण्यात येणाऱ्या स्मार्ट लायटिंगचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हे काम ८९ टक्के इतके पूर्ण झाले आहे. उर्वरित ११ टक्के काम करण्यासाठी ठेकेदार कंपनीला नोव्हेंबरअखेरची मुदत देण्यात आली त्यानंतर मात्र, दंड करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरात ८७ हजार २५१ पथदीप आहेत. या सर्व पथदीपांवर एलईडी ऑगस्ट २०१९ ते जून २०२० दरम्यान मक्तेदाराने पथदीप बसवणे बंधनकारक होते. मात्र सात महिन्यांत ३५ हजारच एलईडी दिवे बसवण्यात आले होते. त्यामुळे नगरसेवकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र, तरीही कोरोना आणि लॉकडाऊनमुळे काम करता आले नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. ते मान्य करून प्रशासनाने संबंधित ठेकेदार कंपनीला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, त्यानंतरही कामाला वेग येत नसल्याच्या तक्रारी आहेत. विशेषत: गेल्या मंगळवारी (दि.१०) स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत तक्रारी करण्यात आल्यानंतर अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी नोव्हेंबरअखेरपर्यंतच ठेकेदाराला मुदत आहे. त्यानंतर मात्र ठेकादाराकडून दंड वसूल करण्यात येणार असल्याचे सांगितले.
इन्फो..
पश्चिम विभागात सर्वात संथ काम
महापालिकेच्या विद्युत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड भागात सर्वाधिक ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर सातपूर विभागात ९७ टक्के, सिडको विभागात ९० टक्के, तर पंचवटीत ८४ टक्के, नाशिक पूर्व विभागात ८३ आणि नाशिक पश्चिम विभागात ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे.