नाशिक : महानगरात गत आठवडाभरात रुग्णवाढीचे प्रमाण प्रचंड असल्याने शासकीय आणि खासगी हॉस्पिटल्समधील बेड्सनादेखील मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शहरात कोविड रुग्णांसाठी कार्यरत असलेल्या मोठ्या खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन बेड्स फु्ल्ल होऊ लागल्याने काही ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन बेड्स मिळणे दुरापास्त होऊ लागले आहे. आठवडाभरात परिस्थितीत झालेल्या आमुलाग्र बदलामुळे आता खासगी रुग्णालयांमध्येदेखील अतिरिक्त ऑक्सिजन बेड्सची गरज निर्माण झाली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी महानगरासह जिल्हाभरातील बहुतांश खासगी रुग्णालये ओस पडलेली होती. अनेक खासगी रुग्णालयांनी तर रुग्णांअभावी दोन महिन्यांपूर्वीच कोविडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन मनपा प्रशासनाकडे तशी मागणीदेखील केली होती. मात्र, मार्चच्या प्रारंभापासून रुग्ण दाखल होण्याची संख्या वाढण्यास प्रारंभ होऊ लागल्याने त्या प्रक्रीयेचा पाठपुरावा बंद करण्यात आला . त्यामुळे अवघ्या दोन आठवड्यात खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली. त्यातही गंभीर रुग्णांना ऑक्सिजन बेड्सच्या मागणीतही प्रचंड वेगाने वाढ झाल्यामुळेच गत दोन दिवसांपासून मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड मिळणे दुरापास्त झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.
इन्फो
शहरात कोविडची एकूण रुग्णालयेे ८४
महानगरात कोविड उपचार करणारी खासगी आणि शासकीय मिळून ८४ रुग्णालये कार्यरत आहेत. त्यात ३१३६ बेड्स , तर १२६१ ऑक्सिजन बेड्स आणि ५२४ आयसीयु बेड्सचा समावेश आहे. सामान्य आणि गंभीर रुग्णांची संख्यादेखील प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच खासगी हॉस्पिटल्समधील ऑक्सिजन बेड्सची संख्या मोठी असूनही ऑक्सिजन बेड्सचा तुटवडा जाणवू लागला आहे.
कोट
उत्तर महाराष्ट्रातूनही रुग्ण आल्याने तुटवडा
नाशिकच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच उत्तर महाराष्ट्रातूनही गंभीर रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. तसेच रुग्णवाढीचा वेगच अफाट असल्याने आधीचे रुग्ण बरे होऊन बेड रिक्त होण्यापूर्वीच नवीनची संख्या वाढत आहे.त्यातही विशिष्ट खासगी हॉस्पिटल्सनाच प्राधान्य दिले जात असल्याने ऑक्सिजन बेड्सचा तुटवडा जाणवत आहे.
डॉ. बापूसाहेब नागरगोजे, आरोग्य अधिकारी, महापालिका
आमच्या कुटुंबातील रुग्णासाठी आम्ही नाशिक शहरातील सर्व मोठ्या हॉस्पिटल्समध्ये विचारणा केली. मात्र, कोणत्याही मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये बेडची उपलब्धता होऊ शकली नाही. अखेरीस खूप प्रयत्नांती ओळखीतून ऑक्सिजन बेड रिकामा झाल्यावर एका रुग्णालयात प्रवेश मिळाला.
श्रीकांत पिसोळकर, नागरीक