----
नाशिक : शहर व परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीत मंगळवारी पोलीस रात्री रस्त्यावर उतरले. रात्री आठ वाजल्यापासून सकाळपर्यंत सुमारे ३६ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. रात्रीच्या संचारबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी देत ते स्वतःही रस्त्यावर आल्याचे चित्र सिडको परिसरात दिसून आले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदीचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. या आदेशांचे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी पोलिसांनी मंगळवारी महत्त्वाच्या वर्दळीच्या काही रस्त्यांवर रात्री नाकाबंदी लावली; तर काही रस्ते बॅरिकेड लावून पूर्णपणे बंद केले होते. नाकाबंदीत नागरिकांसह वाहनांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी पॉईंटवर एक पोलीस अधिकारी चार कर्मचारी व चार विशेष पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. नाकाबंदीदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. विनामास्क फिरणाऱ्यांची कोरोना केअर सेंटरवर ॲन्टिजेन चाचणीसाठी रवानगी करण्यात आली. परिमंडळ-२मध्ये ८७ बेशिस्त नागरिकांकडून ४३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला; तर ‘सोशल डिस्टन्स’चे उल्लंघन केल्याप्रकरणी १५ आस्थापना चालकांकडून ३५ हजार रुपये दंड तर वेळेच बंधन न पाळणाऱ्या ३ आस्थापना चालकांना १५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्या ६१ नागरिकांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली. याप्रमाणे दररोज कारवाई करण्याचे नियोजन शहर पोलिसांनी केले असल्याचे पांडेय यांनी सांगितले.
------
नागरिकांना वळसा अन् उडाले खटके
पोलिसांनी अचानकपणे रस्त्यावर उतरून बहुतांश रस्ते बॅरिकेड लावून बंद केल्याने नागरिकांना वळसा घालून आपापल्या घरी पोहोचावे लागले. यावेळी बॅरिकेडजवळ बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसोबत बहुतांश वाहनचालकांचे खटके उडत होते. अनेकांनी पोलिसांना रस्ते का बंद केले, असा जाबदेखील विचारला. यावेळी पोलिसांनी सीआरमोबाईल वाहनांच्या ध्वनिक्षेपकावरून उद्घोषणा करत ‘सरकारने कोरोनामुळे रात्री आठ वाजेपासून संचारबंदीची घोषणा केली आहे, यामुळे पोलिसांशी कोणीही डोकं लावू नये. विनाकारण रस्त्यावर फिरू नये. ज्या रस्त्यावर वर्दळ आहे, ते रस्ते पूर्णपणे बंद केले आहेत; हट्ट करू नये. पर्यायी मार्गाने जावे.’ असे आवाहन केले.