नाशिक : शहराची वाढती वाहतूक समस्या आणि अन्य वाहनांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीने शहर वाहतूक विभाग स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून शहराच्या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. दररोजच शेकडो दुचाकी आणि चारचाकी रस्त्यावर येत असल्याने नाशिकची वाहतूक समस्या मुंबई, पुण्याइतकीच ज्वलंत रूप धारण करीत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी वाहतूक समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून, यात महापालिका, वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यातून काही वेळा बैठका घेतल्या जातात, परंतु शहराचे वाहतूक नियोजन करण्यासाठी ट्रॅफिक सेल असावा, अशी वेळोवेळी मागणी केली जात होती. मध्यंतरी महापालिकेने मोबॅलिटी सेल तयार केला खरा, परंतु त्यातून फार काही निष्पन्न झाले नाही. आता महापालिकेने शहर वाहतूक विभाग तयार केला असून शहर अभियंत्याकडेच शहर वाहतूक अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.वाहतुकीचा बृहत आराखडाशहरातील रस्ता रुंदीकरण, दुभाजक, वाहतूक बेटे यांचे सुयोग्य नियोजन करण्याचे काम हा विभाग करीत आहे. महापालिकेच्या वतीने वाहतुकीचा बृहत आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला असून, त्याचीदेखील अंशत: अंमलबजावणी सुरू झाली आहे.
नाशिक महापालिकेच्या वतीने शहर वाहतूक विभाग स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:33 AM