गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हवामानात मोठा बदल होवून अधून मधून ढगाळ वातावरण होत असल्याने हवेत उकाडाही वाढला होता. अशातच हवामान खात्यानेही नाशिकसह राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गुरूवारी सकाळपासूनच हवेतील उकाडा वाढून अधून मधून आकाशात ढगांची गर्दी होत होती. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मात्र अचानक आकाशात काळे ढग दाटून येत सोसाट्याचा वारा सुटला. त्यातच ग्रामीण भागातील काही भागात गारपीट सुरू झाल्याने वीजेचा कडकडाट व वादळी वारा सुटून अंधार दाटून येत जोरदार पावसाला सुरूवात झाली. नाशिक तालुक्यातील भगुर, राहूरी, दोनवाढे आदी भागात गारा पडल्याने शेतकऱ्यांच्या गहू, भाजीपाला तसेच द्राक्ष पिकांचे नुकसान झाले. तसेच शहरातही अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. सायंकाळीच पाउस सुरू झाल्याने शासकीय कायार्लयातील कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. अनेकांनी पाऊस थांबण्याची वाट पाहिली तर काहींनी भर पावसातच घराची वाट धरली. या पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले, काही ठिकाणी गटारी तुंबल्याच्याही घटना घडल्या.
पावसाला सुरूवात होताच नेहमीप्रमाणे वीज कंपनीचा भोंगळ कारभार सुरू झाला. शहरातील पंचवटी, सिडको, इंदिरानगर, सातपुर, नाशिकरोड परिसरातील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. शुक्रवारी शिवजयंती असल्याने शिवभक्तांकडून उत्सवाची तयारी केली जात असल्याने त्यांचाही पावसामुळे हिरमोड होवून देखाव्याच्या तसेच मंडप उभारणीच्या कामांवर खंडीत वीज पुरवठ्यामुळे परिणाम झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.
चौकट====
थंडीत अचानक वाढ
गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे तापमान सातत्याने वाढत असून, त्यामुळे हवेतील उकाड्याचे प्रमाण वाढून थंडी ओसरली की काय असे वाटू लागले होते. परंतु गुरूवारी सायंकाळच्या वादळी वारा व पावसामुळे पुन्हा हवामानात झपाट्याने बदल होवून हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला व थंडीत वाढ झाली.