लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : यावर्षीचा उन्हाळा नाशिककरांना चांगलाच तापदायक ठरत आहे. गेल्या मार्च महिन्यापासून नाशिककरांना सलग तपमानाची चाळिशी अनुभवयास येत आहे. गेल्या शुक्रवारीही पारा ४१ अंशांवर पोहचला होता; मात्र शनिवारी (दि.६) नाशिककरांना अल्पसा दिलासा मिळाला. पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्रात ३९ अंश इतक्या कमाल तपमानाची नोंद करण्यात आली.शहराच्या कमाल तपमानात आठवडाभरापासून सातत्याने वाढ होत होती. तपमानाचा पारा ३८अंशांच्या जवळपास फिरत होता. १ मे रोजी ३८.६ अंश इतके तपमान नोंदविले गेले होते. तेव्हापासून सातत्याने तपमानाचा पारा चढता राहिला आहे. यामुळे नाशिककरांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागत असून, उन्हाळी सुटीचा कालावधी असल्याने लहान मुलांच्या आरोग्यावर उष्म्याचा परिणाम होत आहे. पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत अधिक दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.दीड दशकानंतर यावर्षी शहराच्या तपमानाचा पारा मार्च महिन्यामध्येच चाळिशीपार गेला होता. त्यामुळे नागरिक ांनी धास्ती घेतली होती. एप्रिल व मे महिन्यात पारा ४१ अंशांपर्यंत पोहचल्याने उन्हाच्या दाहकतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. कमाल तपमानाबरोबरच किमान तपमानही वाढत असल्याने रात्रीदेखील वातावरणात उष्मा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना घरात बसणेही कठीण होत आहे. उष्म्यापासून दिलासा मिळविण्यासाठी वातानुकूलित यंत्रांचा वापरही वाढला आहे.
शहराचा पारा ३९ अंशांवर
By admin | Published: May 07, 2017 1:18 AM