नाशिक : शिवसेनेचे संपर्क प्रमुख अजय चौधरी यांनी महापालिकेतील सेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांच्या दालनात सेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक बोलावून त्यांना शिस्तीचे धडे दिले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार वर्षांत प्रभागात केलेल्या कामांचा अहवाल नागरिकांसमोर मांडण्याचे आणि सेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांना सन्मानाने सामावून घेण्याचे आवाहनही चौधरी यांनी यावेळी बोलताना केले.शहरातील नागरी प्रश्नांची सोडवणूक, १९ मार्चला काढण्यात येणारा मोर्चा याबाबत संपर्क प्रमुख अजय चौधरी यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांशी संवाद साधला. चौधरी यांनी सांगितले, वर्षभरावर महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली असल्याने सेना नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील नागरी प्रश्नांसाठी आक्रमक व्हावे. संपूर्ण महाराष्ट्र शिवसेनेकडे अपेक्षेने बघत असून, पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पक्षाची ताकद वाढत आहे. सेनेत पक्षांतर्गत गटबाजी, हेवेदावे याला अजिबात स्थान नाही. कुणालाही मते मांडायची असतील त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा. एकमेकांवर कुरघोडी खपवून घेतली जाणार नाही. सेनेत सर्वांत जास्त महत्त्व शिस्तीला आहे. सर्व ज्येष्ठ पदाधिकारी यांची दर आठवड्याला बैठक होणे अपेक्षित असून, त्यात पक्ष संघटन, आंदोलने याबाबत सामूहिक निर्णय घ्यावा, अशी सूचनाही चौधरी यांनी केली. यावेळी गटनेते व महानगरप्रमुख अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, मध्य विधानसभा संपर्क प्रमुख नीलेश चव्हाण, माजी महापौर विनायक पांडे, शिवाजी सहाणे, सत्यभामा गाडेकर, सुधाकर बडगुजर, माजी महापौर नयना घोलप आदिंसह नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सेना नगरसेवकांना शिस्तीचे धडे
By admin | Published: March 02, 2016 12:04 AM