नाशिक : म्युकरमायकोसिसवर प्रभावी ठरणारे ॲम्फोटेरिसिन प्रशासनाकडूनच उपलब्ध करून दिले जात असताना गुरुवारी जिल्हा रुग्णालयातून ॲम्फोटेरिसिनच्या १४० इंजेक्शन्सचे वितरण करण्यात आले. प्रत्यक्षात इंजेक्शनवरील छापील किंमत ५,७६० रुपये असताना सिव्हिलच्या यंत्रणेने संबंधितांकडून प्रतिइंजेक्शन ७,८२४ रुपये असे प्रत्येक इंजेक्शनमागे २०६४ रुपये जादा आकारल्याचे अनेक बाधितांच्या कुटुंबीयांना लक्षात आल्यानंतर नागरिकांनी रोष व्यक्त केला तसेच शासकीय यंत्रणेकडून सामान्यांची लूट झाली तर सामान्यांना कोण वाली उरला, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
ॲम्फोटेरिसिनचे इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्ण जिथे दाखल असेल तेथील हॉस्पिटलचे लेटर तसेच जिल्हा प्रशासनाच्या मेल आयडीवर मेल पाठवून मागणी नोंदवलेल्या नागरिकांना दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, बुधवारी प्राप्त झालेले ६० इंजेक्शन्स आणि गुरुवारी प्राप्त झालेले १४० इंजेक्शन्स हे जे नागरिक हॉस्पिटलचे पत्र घेऊन थेट सिव्हिलमध्ये आले त्यांना निर्धारित रकमेचा चेक दिल्यानंतरच देण्यात आली. त्यातदेखील बुधवारी प्रत्येक इंजेक्शनसाठी सात हजार ८२४ या रकमेप्रमाणे प्रत्येकी चार इंजेक्शन्ससाठी ३१ हजार २९६ रुपये घेण्यात आले. बुधवारी देण्यात आलेले ॲम्फोटेरिसिनचे इंजेक्शन हे सात हजार ८२४ रुपये किमतीचेच होते. मात्र, गुरुवारी दुसऱ्या कंपनीचे ॲम्फोटेरिसिन इंजेक्शन देण्यात आले. त्यावरील छापील किंमत ५,७६० रुपये इतकी होती. तरीदेखील गुरुवारी आलेल्या १४० इंजेक्शन्ससाठी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाकडून प्रत्येकी ७,८२४ याप्रमाणे चार इंजेक्शनसाठी ३१ हजार २९६ रुपयांचे धनादेश स्वीकारण्यात आले. त्यामुळे प्रत्येक इंजेक्शनमागे २०६४ याप्रमाणे चार इंजेक्शनसाठी एकूण ८,२५६ रुपये जादा आकारण्यात आले आहेत. खासगी मेडिकल्समध्ये किंवा दलालांच्या मार्फत लूट होते म्हणून जर प्रशासनाने इंजेक्शन विक्रीचे नियंत्रण स्वत:कडे घेतलेले आहे, अशा परिस्थितीत आधीच आजाराने आणि त्यावरील खर्चाने संत्रस्त झालेल्या बाधितांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याऐवजी जादा रक्कम उकळणे कितपत योग्य आहे, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला.
कोट
रक्कम त्वरित परत मिळावी
आमचे कुटुंब आधीच मोठ्या संकटातून जात आहे. त्यात सर्वत्र केवळ पैशांची लूट सुरू असून, रुग्ण बरा होण्याचीही शाश्वती नाही. अशा परिस्थितीतही बहुतांश नागरिक मिळतील तिकडून पैसे गोळा करून इंजेक्शन्सचे पैसे भरत आहे. त्यात सिव्हिलच्या प्रशासनानेच आमच्याकडून अशी जादा रक्कम उकळली तर नागरिकांनी काय करावे? सिव्हिलच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी याबाबत त्वरित लक्ष घालून आम्हाला रक्कम परत मिळवून द्यावी.
नागरिक, बाधिताचे कुटुंबीय
-------------
इन्फो
इंजेक्शन्सच्या किमतीवर मिळावी सूट
म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांपैकी कुणाला एकूण ८०, कुणाला ९० तर कुणाला १०० इंजेक्शन्सपर्यंत ही इंजेक्शन्स लागत आहेत. अशा परिस्थितीत साडेसात हजारांच्या इंजेक्शन्सची किंमतच सात लाखांवर पोहोचत असून, ऑपरेशनचा खर्च वेगळा, हॉस्पिटलायझेशनचा खर्च वेगळा असल्याने किमान १० ते १५ लाखांचा बोजा बाधितांच्या कुटुंबीयांवर पडत आहे. त्यामुळे किमान इंजेक्शन्स तरी निम्म्या किमतीत मिळाली तरी काहीसा दिलासा मिळू शकेल, असे बाधितांच्या कुटुंबीयांचे मत आहे.
-----------
फोटो
२१इंजेक्शन प्राइस
२१चेक रक्कम