नाशिक : दिंडीमधील वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, प्रत्येक वारकऱ्याची आरोग्य तपासणी व्हावी, याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘आरोग्याची वारी; पंढरीच्या दारी’ असा उपक्रम सुरू केला असून, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून आरोग्य पथक पंढरपूरमध्ये तैनात केले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ३२ जणांचे आरोग्य पथकही पंढरपूरमध्ये दाखल झाले आहे.
‘आरोग्याची वारी, पंढरपूरच्या दारी’ या संकल्पनेतून वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी आरोग्यदूत पंढरीच्या वारीत सेवा बजावणार आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या असून, त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातून आरोग्य पथकांचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातून डॉक्टर्स, वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचारी अशा एकूण ३२ जणांचा चमू पंढरपूरला दाखल झाला आहे. मंगळवारी (दि. २०) इर्मजन्सीसाठी लागणाऱ्या औषधांचा साठा ॲम्ब्युलन्ससही रवाना होणार आहे.
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे. या दिंडीमधील वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी दिंडी मार्गावर प्रत्येक दोन किलोमीटर अंतरावर एक आरोग्य पथक तैनात असणार आहे. पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी चोवीस तास फिरती वैद्यकीय आरोग्य पथके, औषधोपचारासाठी तात्पुरते दवाखाने उभारण्यात आले आहे. या ठिकाणी नाशिकमधून गेलेल्या वैद्यकीय चमूवर जबाबदारी सोपविली जाणार आहे.
नाशिकहून गेलेल्या चमूमध्ये डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी रवाना करण्यात आले आहे. रुग्णसेवा आणि आरोग्य स्वच्छतेच्यादृष्टीने कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. राज्यस्तरावर आरोग्य वारीसाठीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार वारकऱ्यांना आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास त्यांना तत्काळ औषधोपचार, आवश्यकतेनुसार असल्यास मोफत संदर्भ सेवा महात्मा फुले प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमार्फत मोफत शस्त्रक्रिया अशा सुविधांचा देखील लाभ दिला जाणार आहे.