नाशिक : महापालिका शिक्षण समिती सभापती-उपसभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष गट मिळून झालेल्या महाआघाडीकडून सभापती-उपसभापती पदासाठी दावा केला जात असतानाच शिवसेनेनेही सभापती पदासाठी जुळवाजुळव सुरू केली असून समीकरणे बदलण्याचा दावा केला आहे. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीसाठी चुरस बघायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महापालिका शिक्षण समितीच्या सभापती-उपसभापती पदासाठी येत्या ४ जुलैला निवडणूक घेण्यात येणार आहे. समितीवर मनसे- ५, सेना-३, राष्ट्रवादी-३, कॉँग्रेस-२, भाजपा-२ आणि एक अपक्ष याप्रमाणे पक्षीय बलाबल आहे. महापौर, स्थायी समिती सभापती आणि प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत मनसे, कॉँग्रेस,राष्ट्रवादी आणि अपक्ष यांनी एकत्रित मोट बांधत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. त्यामुळे शिक्षण समिती सभापती पदाच्या निवडणुकीतही महाआघाडी कायम राहण्याचा दावा केला जात आहे. शिक्षण समितीला शासनाने स्थगिती दिल्यानंतर सुरुवातीपासून न्यायालयीन लढा लढत यशस्वी झालेले अपक्ष गटनेते संजय चव्हाण यांनी सभापती पदासाठी दावा सांगितला असल्याने त्यांची उमेदवारी महाआघाडीकडून जवळपास निश्चित मानली जात आहे. महापौर अशोक मुर्तडक हे स्मार्ट सिटीच्या कार्यशाळेनिमित्त दोन दिवसांपासून दिल्ली येथे आहेत. महापौर नाशिकला परतल्यानंतर शनिवारी (दि.२७) मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले यांच्यासमवेत महाआघाडीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मनसेचीही भूमिका निश्चित होणार असून मनसेकडून अगोदरच अपक्ष संजय चव्हाण यांचे नाव पुढे आले असल्याने उपसभापती पदासाठी मनसेकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. महाआघाडीत हालचाली सुरू असतानाच विरोधी पक्ष शिवसेनेनेही निवडणुकीत समीकरणे बदलण्याचा दावा केला आहे. शिवसेनेने त्यादृष्टीने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. सेनेकडून सभापती पदासाठी हर्षा बडगुजर यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. महाआघाडीत कॉँग्रेसला अद्याप काहीही न मिळाल्याने सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यातच पश्चिम प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी मनसेने विश्वासघात केल्याने कॉँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. शिक्षण समिती सभापती पदाच्या निवडणुकीत नाराज कॉँग्रेसला सोबत घेऊन सेना-भाजपाकडून सत्ताधाऱ्यांना शह दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सेना-भाजपा युतीच्या पारड्यात वजन टाकावयाचे ठरविल्यास कॉँग्रेसला उपसभापतीपद बहाल केले जाऊ शकते. कॉँग्रेसने युतीला झुकते माप दिल्यास आठ-आठ संख्याबळ होऊन चिठ्ठी पद्धतीचाही अवलंब होऊ शकतो. (प्रतिनिधी)
महाआघाडीकडून सभापती-उपसभापती पदासाठी दावा
By admin | Published: June 27, 2015 2:03 AM