जागांचा दावा करणे म्हणजे ईव्हीएम फिक्स : अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:22 AM2019-07-01T01:22:48+5:302019-07-01T01:23:32+5:30
विधानसभा निवडणुकीत आघाडीला ५० जागादेखील जिंकता येणार नाहीत, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन हे करीत असतील तर याचा अर्थ ईव्हीएम फिक्स आहे, असा संशय कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
नाशिक : विधानसभा निवडणुकीत आघाडीला ५० जागादेखील जिंकता येणार नाहीत, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन हे करीत असतील तर याचा अर्थ ईव्हीएम फिक्स आहे, असा संशय कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. लोकसभेपेक्षा विधानसभेचे चित्र वेगळे असेल असे सांगून राज्यात आघाडीला चांगले यश मिळेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी चव्हाण आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. निवडणुकीसाठी भाजप साम, दाम, दंड भेदनीतीचा अवलंब करीत असून, महाजन यांनी जागांबद्दल बोलण्याऐवजी बॅलेट पेपरचा वापर करणार का? यावर बोलावे, असेही चव्हाण म्हणाले. आगामी विधानसभेची निवडणूक कॉँग्रेससाठी महत्त्वाची निवडणूक असणार आहे. यासाठी कॉँग्रेसकडून जोरदार नियोजन सुरू आहे. राष्टवादीशी आघाडी करण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाने तत्त्वत: मान्यता दिली असून, येत्या आठ दिवसांमध्ये जागा वाटपासंदर्भातील बैठक होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
राष्टÑवादीबरोबरच अन्य समविचार पक्षांशीदेखील आघाडी करण्याची कॉँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. अर्थात तत्पूर्वी सर्व जिल्हाध्यक्षांशी चर्चा करूनच यावर निर्णय घेतला जाणार आहे. यंदा नवीन चेहरे आणि महिलांना संधी दिली जाणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. येत्या ६ जुलै रोजी देशभरातून इच्छुकांचे अर्ज मागविले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
या निवडणुकीत प्रभावी प्रचार राबविताना राज्यातील सरकारचे अपयश जनतेसमोर मांडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक कर्जमाफीचा प्रश्न, कर्जवाटप या विषयावर आंदोलने केली जाणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे मुद्दे वेगळे आहेत, त्याचा परिणाम राज्यांवर होणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये राष्टÑपती राजवट लागू केली म्हणजे सर्व आलबेल आहे,
असे नाही. भाजपला अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत जम्मू- काश्मीरमध्ये निवडणूक होणार नाही, असा दावाही चव्हाण यांनी केला.
वंचित आघाडीशी चर्चा
लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाचा फॅक्टर ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्यावर चर्चेची जबाबदारी सोपविली असून, मनसेला सोबत घेण्याबाबत मतभेद अद्याप कायम असल्याचा खुलासाही चव्हाण यांनी केला.