नाशिक – राष्ट्रवादीचे अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांनी सरकारमध्ये सहभाग घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीत २ गट पडले आहेत. शरद पवार समर्थक आणि अजितदादा समर्थक नाशिकमध्ये आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले. नाशिक शहरात राष्ट्रवादीचं कार्यालय भुजबळ समर्थकांनी ताब्यात घेतले. त्यानंतर या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे २ गट समोरासमोर आल्याने मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले. शरद पवारांनी पक्ष उभारला आणि आज आमच्याच पक्षाचे नेते भाजपासोबत गेले. शरद पवार नेहमी पुरोगामी विचारांचे राहिले. आज जातीयवादी विचारांसोबत हे नेते गेले. हा पक्ष शरद पवारांचा आहे. बाप बापच असतो. शरद पवारच श्रेष्ठ आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी आम्ही शरद पवारांना धोका दिला आहे. भुजबळ, अजितदादा हे आमचे नेते आहेत. पण जे झाले ते योग्य नाही. जिल्हाध्यक्ष असताना आम्हाला कार्यालयात प्रवेश दिला नाही. पोलिसांची दडपशाही वापरून आम्हाला अडवले जातंयं असं शरद पवार समर्थकांनी सांगितले.
नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा ताबा घेतला. याठिकाणी भुजबळ समर्थकांनी अजित पवार, छगन भुजबळ यांच्या घोषणा दिल्या तर दुसऱ्या बाजूने शरद पवारांचे कार्यकर्ते ईडी आणि शरद पवारांच्या नावाने घोषणा देत होते. कालपर्यंत शपथविधीला हजर असणारे आज विरोध करतायेत. सिन्नरच्या आमदारकीचे स्वप्न पाहतायेत म्हणून विरोध करायला जिल्हाध्यक्ष आलेत. विरोध करायला आलेले गजानन शेलार सोडले तर इतर कुणी पक्षाचे कार्यकर्ते नाहीत असा आरोप भुजबळ समर्थकांनी केला. यावेळी शरद पवार समर्थक गजानन शेलार, कोंडाजी आव्हाड हे कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. दुसरीकडे रवींद्र पगार आणि इतर भुजबळ-अजितदादा समर्थकांनी घोषणाबाजी केली. या दोन्ही गटात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला.