नाशिक : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात फटाके खरेदीसाठी उत्साही नागरिकांची गर्दी उसळली असून, यावर्षी आकर्षक रोषणाई करणाऱ्या तसेच कमी आवाजाच्या आणि कमी वायुप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांना अधिक मागणी आहे. गेल्या आठवड्यात प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयामार्फत बाजारातील उपलब्ध असलेल्या विविध फटाक्यांच्या वेगवेगळ्या नमुन्यांची ध्वनिचाचणी घेण्यात आली. यावेळी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फटाक्यांची चाचणी करून १२५ डेसिबलपेक्षा कमी ध्वनिक्षमता असलेल्या फटाक्यांना विक्रीसाठी हिरवा कंदील देण्यात आल्याने ग्राहकांकडून या प्रकारातील फटाक्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होताना दिसते आहे. यात भुईचक्र, रॉकेट, हवेतील आकर्षक रोषणाईच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका व फटाक्यांची लड, सुतळी बॉम्ब अशा जमिनीवरील विविध फटाक्यांना ग्राहकांची पसंती आहे. ग्राहकांना आकर्षित करणारे डबल बार आणि सिंगल बारसारखे फटाक्यांनाही बाजारात मोठी मागणी आहे. दिवाळीच्या अभ्यंगस्नानाला पहाटेचा पहिला फटाका कोणाचा वाजतो यासाठी ग्रामीण भागासह शहरी भागात चढाओढ लागलेली असते. फटाका वाजवण्याची परंपरा जुनी आहे. त्यामुळे दिवाळीला फटाके खरेदी करण्याकडे अगदी श्रीमंतांसह गरीब वर्गाचा कल दिसतो. आपल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकजण फटाके खरेदी करतात. शहरातील गोल्फ क्लब परिसरातील मैदानांवर व तसेच डोंगरे वसतिगृह मैदानावर होलसेल फटाके विक्रे त्यांनी मोठ्या प्रमाणात स्टॉल लावले आहे. या स्टॉल्सवर जिल्ह्यातून ग्राहकवर्ग फटाके खरेदी करताना दिसत आहेत. अगदी टिकल्या वाजवण्याच्या पिस्तुलांमध्ये विविध प्रकार ५० रु पयांपासून पुढे, टिकल्या, भुईचक्र, पाऊस, आकाशबाण, लक्ष्मीतोटा, अॅटमबॉम्ब, फुलबाजे यांसह विविध प्रकार विक्र ीला आलेले आहेत. दरवर्षीपेक्षा याही वर्षी फटाक्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली असली तरीही ग्राहकांची फटाके खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
फटाके खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
By admin | Published: October 29, 2016 12:55 AM