नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्राचे नुकसान टाळण्यासाठी नागरिक व क्लासेस संचालकांकडून क्लासेस सुरू करण्याची मागणी होत होती. त्यांच्या मागणीनुसार शुक्रवार (दि.१५)पासून नववी ते बारावीपर्यंतचे खासगी क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, क्लासेसचालकांनी शासनाचे सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची कमी होतांना दिसत असून रुग्णसंख्या पंधराशेपेक्षा खाली आलेली आहे. जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. कोरोनाचा प्रादुर्भावाचे प्रमाण कमी झाल्याने नवीन वर्षात नववी व बारावीच्या शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती ७० ते ८० टक्के असल्याने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद दिलासादायक असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक पालकांची व क्लासेसच्या संचालकांची मागणीनुसार क्लासेस सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोट-१
अनलॉक जाहीर झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने सर्वच व्यवसाय व सेवा सुरू करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शाळा, क्लासेस सुरू करणे आवश्यक असल्याने क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी
कोट-२
क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाचे नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना स्वागत करीत आहे. गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या शिकवणी वर्गांमुळे जिल्ह्यातील जवळपास दोन हजार क्लासेस संचालकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. शाळा, महाविद्यालयांबरोबर क्लासेसलाही अधिकृत परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही सातत्याने करत होतो. आज त्याला यश मिळाले आहे.
- जयंत मुळे, अध्यक्ष, कोचिंग क्लासेस संचालक संघटना, नाशिक.