नाशिक : महापालिकेने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले असून, शहरातील सुमार ४०५ शाळांमधये २ हजार ६०२ शिक्षक हे शहरातील १,१०,७७३ विद्यार्थ्यांना दिवसाआड पद्धतीने शिकवणार आहेत. शाळेत प्रवेश करण्यापूर्वी २ हजार २४९ शिक्षक, क्लार्क व शिपाई यांची कोरोना चाचणी केली जाणार असून, त्याची तयारीही आरोग्य विभागाच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे.
नववी ते बारावीपर्यंतचे सुरू झाल्यानंतर काेराेना नियमांचे पालन याेग्य हाेत असल्याने कोरोनाचा प्रसार शाळांमधून होताना दिसत नाही. त्यामुळे शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करूनच हे वर्ग सुरू करण्याच्या सुचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एका विद्यार्थ्याला दिवसाआड शाळेत बोलावता येणार असून, अशा विद्यार्थ्यांना महिन्यातील सुट्ट्या वगळता १० ते १२ दिवसच शिक्षण मिळणार आहे. यात प्रामुख्याने गणित, विज्ञान व इंग्रजी हे तीन विषय शिकवले जाणार असून, शाळांमध्ये मुलाला पाठविण्यासाठी पालकांची परवानगीही आवश्यक आहे. त्यासाठी शाळांनी पालकांचे विद्यार्थ्याला शाळेत पाठविण्यासंदर्भातील संमतीपत्र घेणे अनिवार्य असून, शाळांमध्ये सॅनिटायझर, मास्क बंधनकारक करण्यात येणार आहे.
पाचवी ते आठवीचे विद्यार्थी
एकूण शिक्षक - २,६०२
एकूण शाळा - ४०५
खासगी शाळांचे विद्यार्थी -९५,२९७
पालिका शाळांचे विद्यार्थी -१५,४७६
एकूण विद्यार्थी - १,१०,७७३
खासगी शाळांचे शिक्षक -२,१२७
महापालिका शाळांचे शिक्षक ४७५
खासगी शाळा - ३०३
पालिकेच्या शाळा - १०२