मुकुंद बाविस्कर ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सध्या लॉकडाउनमुळे सर्वत्र सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम बंद असले तरी घरच्याघरी नियमितपणे शास्त्रीय नृत्याचा सराव सुरू असून, यातून रोज एकप्रकारे सकारात्मक ऊर्जा मिळते. त्याचप्रमाणे प्रत्यक्षपणे शिष्यांना प्रशिक्षण देता येत नसले, तरी व्हिडिओ अॅप आणि अन्य समाजमाध्यमांतून मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे मत नाशिकमधील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगनांनी व्यक्त केले.आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त आपले अनुभव मांडताना त्यांनी सांगितले की, नृत्य ही एक वैश्विक कला असून, प्रत्येक जण कमी जागेत घरच्याघरी कोणत्याही प्रकारचे नृत्य करू शकतो. सध्याच्या परिस्थितीत आपले शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी नृत्य उपयुक्त ठरणारे आहे, असे अनुभवदेखील अनेकांनी मांडले. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या काळात शास्त्रीय नृत्याविषयी गुरुंकडून आॅनलाइन मार्गदर्शन घेताना काही विद्यार्थिनींनी स्वत: नृत्य आविष्काराचे सादरीकरण करीत त्याचे व्हिडिओ तयार करून अनेकांना पाठविले. मॉर्डन बॅलेचे जनक जिन जॉर्जस नोरेन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दि. २९ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटच्या नृत्य समितीतर्फे भारतात इ. स. १९८२ पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. यंदा लॉकडाउनमुळे नाशिकमध्ये कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही.-------------यंदा आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा करू शकत नाही. आम्ही घरी राहूनच इंटरनेटच्या माध्यमातून नृत्य कार्यक्रमाची संकल्पना सादर करणार आहोत.- रेखा नाडगौडा, ज्येष्ठ नृत्यांगना-----------------गेल्या महिन्याभरात आम्ही आणि आमच्या विद्यार्थिनींनी वैयक्तिकरीत्या भरतनाट्यम आणि धार्मिक गीतांवर आधारित व्हिडिओ बनवून अनेकांना पाठवले.- सोनाली करंदीकर,भरतनाट्यम--------------दरवर्षी आम्ही नृत्याचा कार्यक्रम आयोजित करतो. यंदा घरात राहूनच आॅनलाइन एकत्र संवाद साधणार असून, नृत्यसाधनेबद्दल चर्चा करणार आहोत.- अदिती पानसे, कथ्थक नृत्यांगना----------------------नृत्य हा एकप्रकारे सर्वांगसुंदर व परिपूर्ण व्यायामच आहे. सध्या आम्ही विद्यार्थिनींना व्हिडिओच्या माध्यमातून नृत्यातील अनेक गोष्टी सांगतो.- कीर्ती भवाळकर, कथ्थक नृत्यांगना
शास्त्रीय नृत्यकलेतून रोज मिळते सकारात्मक ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 9:34 PM