नाशिक - पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच नवजात अर्भक दगावल्याचा आरोप झाल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय अधिक्षकांनी केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात डॉक्टरांसह रुग्णालयातील कर्मचा-यांना क्लीनचीट दिली असून तक्रारदाराच्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, शताब्दी हॉस्पिटलचीही या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आशा तांदळे या गर्भवती महिलेला प्रसूतीकळा येत असतानाही तिच्याकडे दुर्लक्ष केल्याने नवजात अर्भक दगावल्याचा आरोप तिच्या पतीसह आईने केला होता. याशिवाय, सदर महिलेच्या आईने मृत अर्भक घेऊन महापालिका मुख्यालय गाठले होते आणि अतिरिक्त आयुक्तांच्या टेबलावरच मृत अर्भक ठेवत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर, आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांसह वैद्यकीय अधिक्षकांकडून या प्रकरणाचा चौकशी अहवाल मागविला होता. त्यानुसार, डॉ. राजेंद्र भंडारी यांनी प्राथमिक चौकशी अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडे सादर केलेला आहे. या प्राथमिक चौकशी अहवालाबद्दल बोलताना डॉ. भंडारी यांनी सांगितले, सदर महिलेकडे दुर्लक्ष केल्याबाबत करण्यात आलेल्या आरोपात तथ्य आढळून आलेले नाही. याऊलट प्रसुतीवेळी एक तास अगोदरपासून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मेतकर त्याठिकाणी हजर होते. त्यांनी महिलेची तपासणी करून प्रसुति केली. परंतु, बाळाच्या फुफ्फुसात पाणी गेल्याने त्याला श्वास घेण्यात अडचणी आल्या. बाळाला तातडीने उपचार होण्याची गरज असल्याने डॉक्टरांनी महिलेच्या नातेवाईकांकडे रुग्णालयांचे दोन-चार पर्याय ठेवले. त्यात शताब्दी हॉस्पिटलमध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचाराची सुविधा असल्याने शताब्दीचा पर्याय महिलेच्या नातेवाईकांच्या संमतीनेच निवडण्यात आला. सदर महिलेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप सिद्ध झालेला नाही. याऊलट डॉक्टरांनी तिच्यावर केलेल्या उपचारांची व तपासणीची नोंद केसपेपरमध्ये असल्याचेही डॉ. भंडारी यांनी सांगितले. दरम्यान, शताब्दी हॉस्पिटलचीही चौकशी करण्यात येत असून त्यानंतर संपूर्ण चौकशी अहवाल आयुक्तांना सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. भंडारी यांनी स्पष्ट केले.कर्मचा-यांना समजरुग्णालयात महिलेला प्रसुतिकळा सुरू असताना परिचारिका मोबाईलवर खेळत असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला होता. त्याचीही चौकशी करण्यात आली असून संबंधित कर्मचा-यांना समज देण्यात आली असल्याचेही डॉ. राजेंद्र भंडारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नाशिकमधील अर्भक मृत्यूप्रकरणी डॉक्टरांसह रुग्णालय कर्मचा-यांना क्लीनचीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 6:37 PM
प्राथमिक चौकशी अहवाल : शताब्दी हॉस्पिटलचीही चौकशी
ठळक मुद्देपंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच नवजात अर्भक दगावल्याचा आरोप बाळाच्या फुफ्फुसात पाणी गेल्याने त्याला श्वास घेण्यात अडचणी आल्या.