नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळती प्रकरणात २४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर चौकशी प्रकरणात जणू काही घडलेच नाही अशा आविर्भावात वैद्यकीय विभागाला क्लीन चिट देण्यात आली आहे. दुसरीकडे ज्या ठेकेदार कंपन्यांचा निष्काळजीपणा २२ जणांच्या जिवाला भोवला, त्यांनाच तिसऱ्या लाटेचे निमित्त करून कोट्यवधी रुपयांचे काम देण्यासाठी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.
महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात १५७ कोराेनाबाधीत उपचार घेत होते. १९ एप्रिल रोजी दुपारी ऑक्सिजन टाकीला गळती झाल्याने रुग्णालयात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना कमी पुरवठा झाला. याठिकाणी स्टॉक म्हणून ड्युरा सिलिंडर पर्यायी प्रमाणात उपलब्ध नव्हते. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळाले नाही आणि त्यामुळेच २४ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्य अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांना शिफारस करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी मुदतपूर्व अहवाल दिला होता. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी यासंदर्भात कार्यवाही करण्यात आली. ऑक्सिजन गळती प्रकरणात पुरेशी दक्षता न घेता हलगर्जीपणा केला म्हणून ऑक्सिजन टाकी व ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पुण्याच्या टायोनिपॉन आणि नाशिकच्या जाधव ट्रेडर्स कंपनीवर ठपका ठेवून त्यांच्याकडून अनुक्रमे २२ व दोन लाख, असा चोवीस लाखांचा दंड केला आहे.
महापालिकेने खासगी ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारला मात्र, महापालिकेतील अन्य अधिकारी तसेच वैद्यकीय विभागाला निर्दोष केले आहे. महापालिकेने टाक्या बसवण्याचे केवळ खासगीकरण केले असले तरी त्यावर लक्ष पुरवण्याची जबाबदारी कोणाची होती आणि मुळात या ठेकेदारांशी करार कोणी केला, पुण्याच्या कंपनीचे तंत्रज्ञ तेथे उपस्थित राहण्याची सक्ती न करताही करार करणारे अधिकारी कोण, पुण्याच्या या कंपनीला काम देण्यासाठी महापालिकेतील कोणत्या अधिकाऱ्याने पुढाकार घेतला याबाबत महापालिकेच्या वर्तुळात चर्चा असताना त्याविषयी चौकशी अहवालात कोणताही निष्कर्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे या प्रकरणातील ठेकेदार कंपनीला साडे चार कोटी रुपयांचे टाक्या पुरवण्याचे काम देण्यासाठी वैद्यकीय विभाग कामाला लागला आहे. त्यासाठी यांत्रिकी विभागाला सांगून अटी-शर्तींमध्ये वारंवार बदल तर करण्यात आले, परंतु ॲडव्हान्स देण्यासाठी सुध्दा प्रचंड दबाव अधिकाऱ्यांवर आणण्यात येत आहे.
इन्फो...
स्थायी समिती मौनात का?
ऑक्सिजन गळतीची दुर्घटना घडल्यानंतर स्थायी समितीच्या बैठकीत महापालिकेच्या स्तरावर चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तीन महिन्यांनतर देखील अशी चौकशी समितीच गठित झालेली नाही. त्यावेळी बैठकीत ऑक्सिजन दुर्घटनेत बळी गेलेल्यांविषयी कळवळा व्यक्त करणारे नगरसेवक आता मौनात का गेले? असाही प्रश्न करण्यात येत आहे.
इन्फो...
वैद्यकीय अधीक्षकांकडून दडवादडवी
यासंदर्भात चौकशी अहवाल आणि कार्यवाहीबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांना वेळावेळी विचारणा करण्यात आली, लोकप्रतिनिधींनी त्यांना चौकशी अहवालाचे काय झाले? असा प्रश्न केला. मात्र, त्यांनी याबाबत काहीच माहिती नाही असे सांगून चौकशी अहवाल दडवतानाच वस्तुस्थिती बाहेर येणार नाही याचीही काळजी घेतल्याची नगरसेवकांची भावना आहे. महापालिकेच्या येत्या महासभेत यासंदर्भात आता विरोधी पक्षांनी लक्ष्यवेधी मांडण्याची तयारी केली आहे.