नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत येत्या जानेवारी महिन्यात स्वच्छ शहरांचे सर्वेक्षण होणार आहे. त्यात नाशिक शहरातही ४ ते २१ जानेवारी दरम्यान सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने सज्जता सुरू झाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या स्वच्छ शहरात सर्वेक्षणाअंतर्गत नाशिक शहराचा ६३ वा क्रमांक आला होता. त्यावेळी सुमारे पाचशे शहरे स्पर्धेत होती. आता मात्र ४ हजार २०३ शहरांमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे. सर्वेक्षणाला एकूण पाच हजार गुण आहेत. त्यापैकी महापालिकेच्या स्वच्छता सेवा, कचरामुक्त शहर, प्रत्यक्ष पाहणी आणि नागरिकांचा प्रतिसाद या निकषांवर गुणदान केले जाणार आहे.विशेष म्हणजे महापालिका क्षेत्रातील नागरिकांचा प्रतिसाद तपासण्यासाठी केंद्र सरकारचे पथक प्रशासनाला न कळवता थेट संवाद साधणार असून, त्यामुळे महापालिकेच्या दृष्टीने काहीसे आव्हानात्मक ठरणार आहे. गेल्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचा क्रमांक पहिल्या १० मध्ये येण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी कचरा कुंड्या लावून वातावरण निर्मिती करण्यात आली होती; परंतु या प्रयत्नांना अपयश आले. यावेळी मात्र असे कुठलेही वातावरण दिसत नाही.
शहरात पुन्हा होणार स्वच्छ सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 1:00 AM