सिडको : सिडकोच्या मध्यवस्तीतून जात असलेल्या नाल्यांमधील घाण व कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मनपा आयुक्तांनी नाले हे बंदिस्त करता येणार नसल्याचे सांगत नाले साफसफाईची जबाबदारी ही मनपाची असल्याचे सांगितले असले तरी पावसाळा तोंडावर आलेला असतानाही सिडकोच्या मध्यवस्तीतून जाणारे नाले तसेच अंबड गावालगतच्या नाल्यांची अद्यापही साफसफाई झाली नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहेत. शहरातील उघड्या नाल्यांमुळे होणारी अस्वच्छता आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे नाले बंदिस्त करण्याची मागणी नागरिकांकडून ‘वॉक वीथ कमिशनर’ या उपक्रमाअंतर्गत आयुक्तांकडे करण्यात आली होती. परंतु नाले बंदिस्त अथवा त्यावर काँक्रीटीकरण केले जाणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. तसेच उघड्या नाल्यांमधील घाण व कचरा साफ करण्याची जबाबदारी ही मनपाची असल्याचेही आयुक्तांनी नागरिकांना सांगितले. परंतु पावसाळा तोंडावर आलेला असताना सिडको भागातील नागरी वस्तीतून जाणारे मोरवाडी, पंडितनगर, उत्तमनगर, दत्तचौक, सेंट लॉरेंन्स शाळेत अंबड गावातील नाले अद्यापही साफ करण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे मनपाकडून पावसाळ्यापूर्वीचे युद्धपातळीवर साफसफाई करण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी हा फार्स अचल्याचे चित्र सिडको व अबंड भागात बघावयास मिळत आहे. या उघड्या नैसर्गिक नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला असल्याने डासांचे प्रमाण वाढले असून, परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाच्या वतीने दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी उघड्या गटारी व नाले साफसफाईची मोहीम राबविण्यात येत असून, यंदा तर मे महिन्याच्या सुरुवातीसच पावसाळी कामे सुरू करण्यात आली असल्याचे सांगत बहुतांशी कामे पूर्ण झाल्याचा दावाही मनपाच्या वतीने करण्यात आला असला तरी प्रत्यक्ष मात्र कामे पूर्ण झाले नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यामुळे मनपाकडून नाले साफसफाईचा फार्स केला जात असल्याचे दिसून येत आहे.
मनपाकडून नाले साफसफाईचा फार्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:46 AM