नाशिक : २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या परिसर स्वच्छतेच्या कामात गैरहजर असलेल्या कर्मचाºयांना जिल्हाधिकाºयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत आयोजित केलेली स्वच्छता मोहीम नागरिकांना ऐच्छिक की सक्तीची असल्याचा वादाचा मुद्दा पुढे आला आहे. स्वच्छता मोहीम सक्तीचीच असेल तर मग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्वच्छतेसाठी ठेकेदार नेमण्याची गरज नाही, अधिकारी-कर्मचाºयांनी दररोज येऊन स्वच्छता केली पाहिजे, अशी संतप्त भावनाही कर्मचारी व्यक्त करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपासून स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरुवात केली असून, त्याचाच भाग म्हणून अधूनमधून शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, नदी-नाले स्वच्छ करण्याची मोहीम शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर राबविण्यात येते. एक दिवसापुरत्या मर्यादित असलेल्या या स्वच्छता मोहिमेतून कचरा गोळा करण्यापेक्षा प्रसिद्धीची हौसच संबंधितांकडून भागवून घेतली जात असल्याचे आजवरच्या मोहिमांतून स्पष्ट झाले आहे. असे असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाने २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविले व तसे पत्र प्रत्येक खातेप्रमुखांना पाठवून त्यांना त्यांच्या पातळीवर कार्यालयाची स्वच्छता तसेच आवारात स्वच्छतेच्या सूचना करण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेसाठी काही अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, तर काहींनी कार्यबाहुल्यामुळे या कार्याकडे पाठ फिरविल्याची बाब जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतलेल्या माहितीतून उघड झाली. खुद्द जिल्हाधिकारी हातात झाडू घेत कचरा काढत असताना, काही अधिकारी व कर्मचाºयांनी स्वच्छतेची बाब गांभीर्याने न घेतल्याचे कारण पुढे करून दोन महिन्यांनंतर स्वच्छता मोहिमेस गैरहजर असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांना जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटिसा बजावल्या आहेत. स्वच्छता मोहिमेस गैरहजर असण्यामागचे कारण या नोटिसीद्वारे विचारण्यात आले असून, त्याचे योग्य लेखी कारण समोर न आल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्याची धमकीही देण्यात आली आहे.
स्वच्छता मोहीम ऐच्छिक की सक्तीची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:18 PM