नाशिक : ज्यांनी आपल्या आरोग्याची पर्वा न करता कुंभनगरीत दाखल झालेल्या लाखो भाविकांचे आरोग्य सांभाळले आणि सार्वजनिक स्वच्छता राखत कुंभनगरीच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात दिवस-रात्र एक केला अशा कुंभमेळ्याच्या सफाई कर्मचाऱ्यांची मात्र अडीच महिन्यांपासून परवडच होत आहे. मजुरीची रक्कम हातात पुरेशी पडली नसल्याने सफाई कामगार उपेक्षित असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे; मात्र याचे पालिका प्रशासन अथवा मक्तेदारांना कुठलेही सोयरसुतक नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कुंभमेळ्याच्या कालावधीमध्ये शहर स्वच्छ रहावे म्हणून पालिका प्रशासनाने रामकुंडापासून थेट साधुग्रामपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ठेकेदारी पध्दतीने सफ ाई कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. सुमारे तीन हजार सफाई कर्मचारी गेल्या अडीच महिन्यांपासून अहोरात्र राबत होते. यामुळे कुंभनगरी स्वच्छ राहण्यास मदत झाली व शहराचे आरोग्यही टिकून राहिले. वातावरण बदलामुळे काही दिवस साधुग्राम ‘फणफणले’ होते; मात्र अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्यास प्रतिबंध बसला तो केवळ सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे. या सफाई कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये केवळ महिनाभराची रक्कम जमा झाली असून, उर्वरित दिवसांची मजुरी अद्याप जमा होत नसल्यामुळे सफाई कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या शहरात सुमारे एक हजार कर्मचारी शिल्लक राहिले असून, त्यांना उर्वरित रकमेची प्रतीक्षा लागून आहे.प्रशासनाकडून मात्र सफाई कर्मचाऱ्यांना रोजंदारीने मजुरीची रक्कम वेळेवर मिळेल याचे साधे नियोजनही पालिका प्रशासनाला करता आले नाही, त्यामुळे कुंभनगरी स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडले आहे; मात्र त्यांना औषधोपचारासाठी पैसे नसल्याने त्यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. गोदाघाट परिसरात काही सफाई कर्मचाऱ्यांचे चिमुरडे खाऊ विक्री करताना दिसून आले.
पैशांअभावी सफाई कामगारांची उपासमार
By admin | Published: September 20, 2015 11:00 PM