सायखेडा : पुण्यश्लोक अहल्यादेवी सेवा संघ गोदाकाठ व गडकोट संवर्धन संस्था नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २३) निफाड तालुक्यातील सोनगाव येथील पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या काळात बांधलेल्या ५२ पायऱ्या असलेल्या बारवेची स्वच्छता करण्यात आली. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांनी सर्वसामान्य नागरिक, पशू-पक्षी व जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून ठिकठिकाणी बारव बांधल्या आहेत. त्यातील एक बारव सोनगाव येथे आजही जिवंत स्वरूपात आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या मनलहरीपणामुळे या बारवेची दुर्दशा झाली होती. त्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक बाटल्या, कचरा, झाडांची पाने व फांद्या, इतर वस्तू साचल्याने पाण्याला दुर्गंधी येत होती. वस्तीवर डासांचे साम्राज्य वाढले होते. बारवेभोवती झाडाझुडपांचे साम्राज्य वाढल्याने त्यांची मुळे आत गेल्याने बारवेचे काम मोडकळीस आले होते. भाऊसाहेब ओहळ यांनी बारव स्वच्छ करण्याचे ठरवले. पुण्यश्लोक अहल्यादेवी सेवा संघ गोदाकाठ व शिवकार्य संस्था नाशिक जिल्हा यांच्या माध्यमातून त्यांनी ते करून घेतले. त्यावेळी शिवकार्य संस्थाचे संस्थापक अध्यक्ष राम खुर्दळ, भाऊसाहेब चव्हाणके, किरण शिरसाठ राजेंद्र कटारे, बाळासाहेब जाधव, संकेत भानोसे, रुद्र चव्हाणके आदींसह सहकारी उपस्थित होते. बारव परिसर व पाणी स्वच्छ झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
सोनगाव येथील पुरातन बारवेची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:14 AM