इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीची सभा होऊन सदस्यांनी स्वच्छतेप्रश्नी प्रशासनाला जाब विचारला. प्रभागात ठिकठिकाणी स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी करत सदस्यांनी उद्यान आणि पाणीपुरवठाप्रकरणीही नापसंतीचा सूर लावला. पूर्व प्रभाग समितीची सभा सभापती शाहीन मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रभाग २३ मध्ये स्वच्छता होत नसल्याने साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची तक्रार चंद्रकांत खोडे यांनी केली. सिटी उद्यानात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव होत असल्याने त्याबाबत कार्यवाहीचीही मागणी खोडे यांनी केली. प्रभाग ३० मध्ये पालापाचोळा उचलण्यासाठी घंटागाडी येत नसल्याचे श्याम बडोदे यांनी निदर्शनास आणून दिले. पूर्वी प्रभागास ५२ सफाई कर्मचारी होते. आता त्यांची संख्या २६ वर आणण्यात आली आहे. त्यामुळे स्वच्छता नीट होत नाही. अनेक कर्मचारी स्वत: कामावर न येता बदली कर्मचारी पाठवत असल्याचा आरोपही बडोदे यांनी केला. सतीश सोनवणे यांनी सांगितले, लाखो रुपये खर्च करून स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे परंतु, दुर्दैवाने स्वच्छता होत असल्याचे दिसून येत नाही. मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. राजीवनगर झोपडपट्टीलगत उघड्यावर अनधिकृतपणे मांसविक्री करणाºयांमुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढते आहे. त्यांचा बंदोबस्त करावा. धरणात मुबलक पाणी असतानाही प्रभाग ३० मधील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार सोनवणे यांनी केली. वडाळागावात उघड्यावरील गटारी तुंबून त्यातील घाण-दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवर येत असते. या गटारींची नियमित साफसफाई होत नाही. तसेच धूर फवारणी करणाºया मशीनची संख्याही कमी आहे. अनेक अपार्टमेंटच्या तळमजल्यांमध्ये पावसाचे पाणी साचून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याची तक्रार डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केली. सुप्रिया खोडे यांनी वडाळागावातील जय मल्हार कॉलनीसह परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे सांगितले. प्रभाग २३ मधील धोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी रुपाली निकुळे यांनी केली. यावेळी सभापतींनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश विभागाच्या अधिकाºयांना दिले.
स्वच्छतेचा प्रश्न गाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:24 AM