सिन्नर : स्वच्छता ही सेवा या मोहिमेंतर्गत नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.सिन्नर नगर परिषद कार्यालय येथे नगर परिषदेचे सर्व अधिकारी-कर्मचारी, प्रवरा कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन उन्नती शहरस्तरीय संघ, सावित्रीबाई, नारीशक्ती, खडकपुरा, भैरवनाथनगर, सहेली, प्रेरणा वस्तीस्तरीय संघ कार्यकारिणी सदस्य तसेच महिला बचत गट सदस्य यांनी प्रथम स्वच्छतेबाबत शपथ घेतली. त्यानंतर नगर परिषद कार्यालयापासून वावीवेस, क्रांती चौक, तानाजी चौक, शिवाजी चौक, गणेशपेठ, नेहरू चौक ते बसस्थानक येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत रॅलीद्वारे स्वच्छता ही सेवाबाबत नागरिकांत जनजागृती करण्यात आली.तीन दिवसांत शहरातून ‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम राबविण्यात येणार असून, एकदा वापरात येणारे प्लॅस्टिक जमा करण्यात येणार आहे. लोणारे कॉम्प्लेक्स येथे व चौदा चौक वाडा येथे असे दोन ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. वरील तीन दिवसांच्या मोहिमेतून जमा होणारे प्लॅस्टिक सदर संकलन केंद्रात जमा करण्यात येणार आहे. प्लॅस्टिकचा वापर न करणे याबाबत शपथ घेणे व त्याबाबत हमीपत्र भरून घेणे, मार्केट परिसर, सार्वजनिक ठिकाणी श्रमदान करून प्लॅस्टिक जमा करण्यात येणार आहे. शहरातील घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाकडे असलेले प्लॅस्टिक जमा करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी सदर मोहिमेस सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी केले.
सिन्नर पालिकेतर्फे स्वच्छता रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 6:32 PM