मालेगाव : अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छतेसह इदगाह भागातील रस्ते, फळविक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आमदार आसिफ शेख यांनी मनपा प्रशासनाला पत्राद्वारे केल्या आहेत. १५ मे पासून मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास प्रारंभ होत आहे. या महिन्यात मुस्लीम बांधव उपवास, नमाज व अन्य धार्मिक विधी पार पाडतात. सध्या शहरात अस्वच्छतेमुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे, म्हणून मनपाने दहा दिवसांत नियोजनबद्ध स्वरूपात मोहीम राबवून दैनंदिन सुका व ओला कचरा उचलण्यात यावा, जंतुनाशक फवारणी करावी, नवीन बसस्थानक ते दरेगाव शिवारपर्यंत रस्त्यांच्या दुतर्फा फळविक्रेत्यांच्या हातगाड्यांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी, प्रार्थनास्थळ मार्गावरील रस्ते दुरुस्त करावेत, असे पत्रकात शेवटी नमूद केले आहे.
रमजानपूर्वी शहर स्वच्छता, रस्ते दुरुस्तीच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 12:14 AM