भगूर : येथील दारणा नदीकिनारी असलेल्या जलदान विधी घाटाची स्वच्छता करून त्या ठिकाणी असलेले खड्डे बुजवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.दहा वर्षांपूर्वी भगूर नगरपालिकेने दारणा नदीकिनारी जलदान विधी घाट बांधला होता. मात्र या घाटाकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याने त्याठिकाणी अस्वच्छता वाढली आहे. भिकारी, जुगारी, मद्यपी आदिंचा त्या ठिकाणी सतत वावर असतो. जलदान विधी घाट व नदीकाठच्या पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता झाल्याने त्याठिकाणी विधी करण्यास येणाऱ्या कुटुंबीयांना स्वत: स्वच्छता करावी लागते. घाटाच्या पायऱ्यांलगत मोठा खड्डा निर्माण झाला असून, त्या ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. धार्मिक विधी झाल्यानंतर संबंधित कुटुंबाला पायऱ्यावरून उतरून त्या डबक्यातून मार्ग काढावा लागतो. भगूर नगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जलदान विधी घाट व पायऱ्यांची स्वच्छता करून त्या ठिकाणी असलेल्या मोठ्या खड्ड्यात भर टाकून तो खड्डा बुजवावा, तसेच १०-१५ दिवसांतून जलदान विधी घाटाची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
जलदान विधी घाटाची स्वच्छता करावी
By admin | Published: October 03, 2016 12:15 AM