जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ६१९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी रोजी झाल्या होत्या. १८ जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण व नंतर महिला सरपंच आरक्षण जाहीर झाले होते. तथापि, या आरक्षणावर काही ग्रामपंचायतींच्या नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सिन्नरसह निफाड, चांदवड व नांदगाव या तालुक्यातील सरपंच व उपसरपंच निवडीला १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर या चार तालुक्यातील सरपंच व उपसरपंच निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता सिन्नर, चांदवड, निफाड व नांदगाव तालुक्यातील सरपंच व उपसरपंच निवडणूक जाहीर झाली आहे. या चार तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या जास्त असल्याने या एकाच दिवशी निवडणुका घेणे शक्य नसल्याने २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी या दोन दिवशी निवडणुका घेण्यात येणार आहे.
चौकट-
लाभणार प्रथम नागरिक
सिन्नर तालुक्यात ११४ पैकी १०० ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. १०० पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरित ९० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते. त्यामुळे आता १०० ग्रामपंचायतींच्या प्रथम नागरिक (सरपंच) होण्यासाठी येत्या २५ व २६ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. या चार तालुक्यात सर्वात जास्त १०० ग्रामपंचायती सिन्नर तालुक्यातील आहेत.
इन्फो
‘सरपंच आणि उपसरपंच निवडणूक २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त झाले आहेत. सिन्नर तालुक्यात १०० ग्रामपंचायतींना सरपंच आणि उपसरपंच निवडले जाणार आहेत. दोन टप्प्यात म्हणजे २५ आणि २६ तारखेला निम्म्या-निम्म्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
- राहुल कोताडे, तहसीलदार, सिन्नर